मध्यरात्री पत्नी अन् मुलीला संपवत नवऱ्यानेही उचलले टोकाचे पाऊल; उल्हासनगरमध्ये अख्ख कुटुंब संपलं
योगेश पांडे / वार्ताहर
उल्हासनगर – उल्हासनगर भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे .आर्थिक विवंचनेतून आधी पत्नी आणि अल्पवयीन मुलीची हत्या करत पतीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आल्याने उल्हासनगर कॅम्प नं १ मध्ये मोठी खळबळ उडाली आहे . पवन पहुजा असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे .आर्थिक विवंचनेमुळे त्याने आधी पत्नी नेहा आणि मुलगी रोशनी हिला संपवले .नंतर स्वतः आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी मोबाईलमध्ये आत्महत्येचं कारण सांगणारा व्हिडिओ करत त्याने टोकाचे पाऊल उचलले आहे. एका रात्रीत सगळं कुटुंब संपल्याने परिसरात गोंधळाचे वातावरण होते.
गुरुवारी मध्यरात्री घडलेल्या या घटनेनंतर घटनास्थळी उल्हासनगर पोलीस तातडीने दाखल झाले होते. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करत तिघांचेही मृतदेह शबविच्छेदनासाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात हलविले. पंचनाम्यानंतर तपासात पोलिसांना मोबाईल मध्ये पतीने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ सापडला. यात वाढलेल्या आर्थिक ताणामुळे पत्नी व मुलीची हत्या करून त्याने आत्महत्या करत असल्याचे कारण सांगितले आहे. पवन हा सोनार गल्ली परिसरात एका दुकानात कामाला होता .गुरुवारी मध्यरात्री त्याने मुलगी व पत्नी यांची हत्या करून स्वतः आत्महत्या केली. याप्रकरणी आता उल्हासनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.