१८ वर्षीय तरुणीला भररस्त्यात अडवून दोन तरुणांकडून हत्या;घटना सीसीटीव्ही मध्ये कैद
योगेश पांडे / वार्ताहर
पिंपरी चिंचवड – १८ वर्षीय तरुणीची भररस्त्यात हत्या करण्यात आल्याची घटना पिंपरी चिंचवडमध्ये समोर आली आहे. शहरातील वाल्हेकरवाडी परिसरातील कृष्णाईनगर परिसरात ही घटना घडली. दोन तरुणांनी पाठलाग करुन तरुणीची धारधार शस्त्राने वार करून हत्या केली. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज देखील समोर आलं आहे. कोमल जाधव असं मृत मुलीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरुन आलेल्या दोन तरुणांनी कोमलवर वार करत तिची हत्या केली. घटना एवढी भयंकर होती की या दुर्घटनेत कोमल चा जागीच मृत्यू झाला. कोमलची हत्या का झाली, याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
हत्या केल्यानंतर हे तरुण परिसरातून फरार झाले. मात्र परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात ही घटना कैद झाली आहे. दोन्ही आरोपींनी हेल्मेट घातलेलं असल्याने त्यांचे चेहरे स्पष्ट दिसत नाहीत. पोलिसांनी या सीसीटीव्ही दृश्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.