मुंबईत दोन कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त; थायलंड, मलेशियातून हवाई तस्करी, एकाला अटक
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबई पोलिसांच्या अंमलीपदार्थ विरोधी पथकाने विदेशातून हवाई तस्करीद्वारे शहरात आलेला तब्बल दोन कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा (वीड) जप्त केला. पोलिसांनी याप्रकरणी वीरू ठाकूर (४७) याला अटक केली असून हा उच्च प्रतीचा विदेशी गांजा पश्चिम उपनगरातील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये विकला जाणार होता. हा गांजा नेमका कसा मुंबईत आणला गेला आणि तो कुणाला पुरविण्यात येणार होता, याचा तपास पोलिस करीत आहेत. मुंबईत वेगवेगळ्या माध्यमातून अमली पदार्थांची तस्करी आणि विक्री केली जाते. तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी अमली पदार्थविरोधी पथकाच्या वतीने बारकाईने नजर ठेवली जाते. अमली पदार्थविरोधी पथकाच्या घाटकोपर कक्षाचे प्रभारी पोलिस निरीक्षक अनिल ढोले यांना अंधेरीच्या लोखंडवाला परिसरात हायड्रोपोनिक गांजाची मोठी खेप उतरल्याची माहिती मिळाली. या माहितीची शहानिशा करण्यासाठी निरीक्षक पाटील, सहायक निरीक्षक, खोलम, हवालदार कानडे, काळे, गोमासे यांच्या पथकाने सापळा रचून विदेशी गांजाच्या तस्करी करणाऱ्या वीरू ठाकूर याला अटक केली. त्याच्याकडे सुमारे दोन किलो गांजाचा साठा सापडला. हा साठा बँकॉक, मलेशिया, थायलंड या देशातून आलेल्या प्रवाशांमार्फत (कॅरिअर) भारतात आणला गेला. या प्रवाशांनी आपल्या सामानात विशेषतः कॉर्नफ्लेक्सच्या डब्यांमध्ये दडवून तो मुंबई विमानतळावर आणला, अशी माहिती पथकाच्या हाती लागली.
पश्चिम उपनगरातील वांद्रे, खार, सांताक्रूझ, विलेपार्ले, ओशिवरा या भागातील श्रीमंत, उद्योगपती, व्यावसायिकांची तरुण मुले, बॉलीवूडमध्ये कार्यरत विविध स्तरावरील कलाकार असावेत, अशी माहिती आहे. वीरू ठाकूर याच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती समोर अली की, बरेच काही उघड होईल, असेही सांगण्यात येत आहे. हायड्रोपोनिक गांजा हा गांजाच्या प्रकारातील उच्च प्रतीचा गांजा आहे. इतर प्रकारापेक्षा हा गांजा तुलनेने महाग असल्याने श्रीमंत, उच्चभ्रू वर्गामध्ये या गांजाचे सेवन केले जात असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. विदेशातून तस्करी करण्यात आल्याने यामागे मोठी साखळी सक्रिय असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.