मैत्रिणीच्या घरी गेलेल्या २१ वर्षीय तरुणीला कोंडून ठेवत तब्बल ३८ दिवस बलात्कार
योगेश पांडे / वार्ताहर
टिटवाळा – टिटवाळा बल्याणी परिसरात राहणाऱ्या २१ वर्षीय तरुणीचा घरात आजीबरोबर वाद झाल्याने ती घर सोडून कामावर ओळख झालेल्या मैत्रिणीच्या घरी राहण्यास गेली. मात्र या मैत्रिणीने तिचा गैरफायदा घेत दुसऱ्या मैत्रिणीच्या मदतीने या तरुणीला नशेचे इंजेक्शन देत कोंडून ठेवले. तर मैत्रिणीच्या ओळखीतील चार ते पाच जणांनी तिच्यावर तब्बल ३८ दिवस बलात्कार केल्याप्रकरणी टीटवाळा पोलिसांनी तरुणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरु केला आहे. बल्याणी परिसरात आपली आजी आणि चुलत भाऊ बहिणीसोबत राहणारी २१ वर्षीय तरुणी घर बांधणीवर मजुरी करून कुटुंबाला हातभार लावते. १९ मार्च रोजी रात्री १० वाजता या तरुणीचे आजीबरोबर भांडण झाल्याने तिने रागाच्या भरात घर सोडले. आपल्याबरोबर बांधकाम साईटवर काम करताना ओळख झालेल्या मैत्रीण जिनत हिच्या बल्याणी येथील घरी गेली. तर दुसरी मैत्रीण शबनम तिच्याच शेजारी राहत असल्याने सदरची तरुणी कधी जीनतच्या तर कधी शबनमच्या घरी राहत होती.
१० दिवसानंतर तिने आपण घरी जात असल्याचे मैत्रीणीना सांगताच त्या दोघींनी सगनमत करून आपला मित्र गुड्डू यास चारचाकी गाडी घेऊन बोलावले. गुड्डू आणि त्याच्याबरोबर तरुणीच्या ओळखीचा असलेला गुलफाम असे दोघे गाडी घेऊन आल्यानंतर शबनम आणि झीनत यांनी या तरुणीला घरी सोडण्याच्या बहाण्याने गाडीत बसवले मात्र तरुणीला घरी न सोडता तिला एन आर सी कंपनीच्या मागे असलेल्या चाळीत चाळीचे काम दाखविण्याच्या बहाण्याने नेले. तिथे नेल्यानंतर शबनमने या तरुणीच्या मानेवर इंजेक्शन देत तिला बेशुद्ध केले बेशुद्ध अवस्थेतच तिला रामबाग येथील लियाकतच्या रूम मध्ये सोडण्यात आले. तिथे लियाकत याने तिच्यावर ती बेशुद्ध असतानाच बलात्कार केल्याचा आरोप या तरुणीने तक्रारीत केला आहे. सलग चार ते पाच दिवस आपण शुद्धीवर येताच पुन्हा आपल्याला नशेचे इंजेक्शन देत आपल्यावर बलात्कार केल्याचे या तरुणीचे म्हणणे आहे. आपल्याला घरी जाऊ देण्याच विनंती केल्यानंतर या पाच जणांनी आंबिवली येथील आली इराणी याला बोलावून घेत मला तक्रार केल्यास फाशी देण्याची तसेच घरच्यांना मारण्याची धमकी देत आजी विरोधात खोटी तक्रार देण्यास भाग पाडले. यानंतर या तरुणीला सातत्याने नशेचे औषध देत कधी आंबिवली येथील चाळीत तर कधी रामबाग येथील लियाकतच्या घरी नेत तिच्यावर सातत्याने अत्याचारकेले जात होते. दरम्यान ३ मे रोजी रात्री १२ वाजता आंबिवली येथील चाळीत तरुणी एकटीच असताना शुद्धीवर येताच तिने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र दरवाजाला कुलूप असल्याने तिने खिडकीतून जोरजोरात रडून आपल्याला बाहेर काढण्याची विनंती केल्यानंतर एका व्यक्तीने दरवाजाचे कुलूप तोडून तिला तिथून बाहेर काढत तिच्या आजीच्या घरी सोडले. तब्बल ३८ दिवस या तरुणीवर सातत्याने अत्याचार होत असल्याने शरीराने आणी मनाने पूर्णपणे खचलेल्या या तरुणीने आजीने धीर दिल्यानंतर मंगळवारी शबनम, जीनत, गुड्डू, गुलफाम, लियाकत, अली ईराणी याच्यासह आणखी एका अनोळखी इसमाविरोधात टीटवाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरु केला आहे. मात्र आधुनिकतेचा डंका पिटणाऱ्या कल्याण सारख्या शहरात एखाद्या तरुणीला नशेचे इंजेक्शन देत तब्बल ३८ दिवस अत्याचार करणाऱ्या या नराधमाना कधी अटक केली जाणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.