वरंधा घाटात शीर कापलेला मृतदेह दिला टाकून; पोलिसांकडून १२ तासात गुन्हा उघडकीस आणून दोघांना केले जेरबंद
पोलीस महानगर नेटवर्क
पुणे – पुणे तिथे काय उणे या उक्तीप्रमाणे पुण्यात गुन्हेगारीने उच्छाद मांडला आहे. पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरुणाचा खुन करुन त्याचे शिर कापून मृतदेह वरंधा घाटात टाकून दिल्याचे आढळून आले होते. ग्रामीण पोलिसांनी १२ तासात मृतदेहाची ओळख पटवून खुनाचा गुन्हा उघडकीस आणून दोघांना अटक केली आहे. संतोष भिकु पिसाळ (वय ४३, रा. साई प्लॅनेट, वडगाव बुद्रुक, ता. हवेली, मुळ रा. रांजे, ता. भोर) आणि अनिकेत चंद्रकांत पिसाळ (वय २९, रा. अनंत सृष्टी, आंबेगाव खुर्द, ता. हवेली) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. संतोष ऊर्फ प्रमोद रघुनाथ पासलकर (वय ४०, रा. सोनल हाईटस, वडगाव बुदु्क, ता. हवेली) असे खुन झालेल्याचे नाव आहे. संतोष पासलकर आणि संतोष पिसाळ हे नातेवाईक आहेत.
भोरमधील शिरगाव येथील जननी माता मंदिरापासून जाणार्या रस्त्यालगत एका पुरुषाचा शिर नसलेला मृतदेह २६एप्रिल रोजी आढळून आला होता. एका जनावरे चरण्यासाठी गेलेल्या व्यक्तीने हा मृतदेह पाहिल्यानंतर त्याने ही बाब पोलीस पाटील यांना सांगितले. पोलीस पाटील सुधीर रामचंद्र दिघे (वय ५२, रा. वारवंड, ता. भोर) यांच्या फिर्यादीवरुन खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
स्थानिक गुन्हे शाखेचे पथक समांतर तपास करत होते. पोलीस हवालदार अमोल शेडगे यांना बातमीदाराकडून माहिती मिळाली की, संतोष पासलकर हा दोन दिवसांपासून बेपत्ता आहे. त्याचा नातेवाईक संतोष पिसाळ याच्याशी दोन दिवसांपूर्वी भांडण झाले होते. त्यांचा जुन्या वादावरुन एकमेकांवर राग आहे, अशी माहिती मिळाली. पासलकर यांच्या नातेवाईकांकडून हा मृतदेह संतोष पासलकर याचाच असल्याचे निष्पन्न झाले. संतोष पिसाळ याला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने व साथीदाराने हा खुन केल्याचे निष्पन्न झाले. संतोष पासलकर हे संतोष पिसाळ यांच्यावर नेहमी संशय घ्यायचे. त्यावरुन त्यांच्यात नेहमी वाद होत असत. या कारणावरुनच पिसाळ याने अनिकेत याला बरोबर घेऊन खुन केला. त्यानंतर वरंधा घाटात मृतदेह टाकून दिला होता. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार, विभागीय पोलीस अधिकारी तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोलीस पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आण्णा पवार, सहायक पोलीस निरीक्षक दत्ताजीराव मोहिते, सहायक फौजदार हनुमंत पासलकर, पोलीस हवालदार अमोल शेडगे, बाळासाहेब खडके, पोलीस अंमलदार मंगेश भगत, धीरज जाधव, धर्मवीर खांडे यांनी केली आहे.