मॉक ड्रिल कसलं करता? कोम्बिंग ऑपरेशन करा – राज ठाकरे

Spread the love

मॉक ड्रिल कसलं करता? कोम्बिंग ऑपरेशन करा – राज ठाकरे

पहलगाम हल्ल्यानंतर मोदींनी बिहारमध्ये प्रचार अन् फिल्म इंडस्ट्रीच्या कार्यक्रमाला जायला नव्हतं पाहिजे; पहलगाम हल्ल्यावरुन पंतप्रधान मोदी लक्ष्य

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय सैन्याने मंगळवारी रात्री पाकव्याप्त काश्मीरमध्ये विमानांच्या साहाय्याने क्षेपणास्त्रांचा मारा करुन दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले. या मोहीमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असे नाव देण्यात आले होते. या मोहीमेतंर्गत पाकव्याप्त काश्मीरमधील ९ दहशतवादी तळ उद्ध्वस्त झाले.या पार्श्वभूमीवर देशभरातून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारच्या निर्णयक्षमतेचे कौतुक होत असताना मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी मोदींना खडे बोल सुनावले आहेत. दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध होऊ शकत नाही. त्याउलट ज्या अतिरेक्यांनी हल्ला केला, त्यांना शोधून त्यांचा बंदोबस्त केला पाहिजे. पण ज्यांनी हल्ला केला तेच अजून आपल्याला सापडले नाहीत. त्यामुळे देशात मॉक ड्रिल नाही तर कोम्बिंग ऑपरेशन करण्याची गरज आहे, असे सडेतोड मत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केले.राज ठाकरे यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील सुरक्षा यंत्रणांच्या त्रुटींवर बोट ठेवले. पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी अजून सापडलेले नाहीत. दरवर्षी हजारो पर्यटक जिथे जातात, तिकडे सुरक्षा का नव्हती, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे या दहशतवाद्यांना कोम्बिंग ऑपरेशन करुन हुडकून काढणे जास्त महत्त्वाचे आहे. त्याऐवजी एअर स्ट्राईक करुन लोकांचं लक्ष भरकटवणं किंवा युद्ध करणे हा पर्याय नाही, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

सरकार जिथे चुकते तिथे चुका दाखवल्याच पाहिजेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यावेळी पंतप्रधान मोदी सौदी अरेबियात होते. तो दौरा अर्धवट सोडून ते भारतात आले आणि थेट बिहारला प्रचाराला गेले. ही गोष्ट करण्याची गरज नव्हती. त्यानंतर मोदी केरळमध्ये अदानींच्या बंदराचे उद्घाटन करायला गेले. यानंतर त्यांनी फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित व्हेव कार्यक्रमाला उपस्थिती लावली. इतकी गंभीर परिस्थिती असताना या गोष्टी टाळता आल्या असत्या, असे खडे बोल राज ठाकरे यांनी सुनावले. नाक्यानाक्यावर ड्रग्ज मिळतायत. ते येतायत कुठून? का येतायत? लहान लहान पोरं ड्रग्ज घेतायत. शाळेतली पोरं ड्रग्ज घेतायत. ऑपरेशन सिंदूरसारखी नावं देऊन काही साध्य होत नाही. तुम्ही नेमकी काय पावलं उचलतायत, इतके दिवस जे कार्यक्रम मोदींनी घेतले त्याची गरज नव्हती, असेही राज ठाकरेंनी म्हटले. पहलगामला ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी मी पहिल्यांदा ट्विट केले होते की ज्यांनी हल्ला केला त्यांना कठोरातले कठोर शासन झाले पाहिजे. पण दहशतवादी हल्ल्याचे उत्तर युद्ध नसते. अमेरिकेमध्ये दोन ट्विन्स टॉवर पाडले, म्हणून त्यांनी तिकडे जाऊन काही युद्ध केले नाही. त्यांनी ते अतिरेकी शोधून ठार मारले. देशात युद्धजन्य परिस्थिती आणायची, मॉक ड्रिल करायचं सायरन वाजवायचे, हे काय सुरू आहे, असे राज ठाकरे यांनी विचारले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon