मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवाशावर चाकू हल्ला; हाता-पायावर वार, चार आरोपींना अटक
योगेश पांडे / वार्ताहर
पालघर – मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये एका प्रवासी महिलेवर चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर महिला मुंबईहून इंदोरला आपल्या मुलांना आणण्यासाठी प्रवास करत होती. मात्र, प्रवासादरम्यान तिचा तिच्याच डब्यातील काही प्रवाशांशी वाद झाला आणि त्याचे पर्यवसान थेट हिंसक हल्ल्यात झाले. मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईहून सुटलेल्या अवंतिका एक्स्प्रेसमध्ये महिला प्रवास करत होती. तिच्या डब्यात असलेल्या लोकांसोबत महिलेचा वाद झाला. या वादातून तिला मारहाण करून तिच्या हाता पायावर धारदार चाकूने वार करण्यात आले. या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने वैद्यकीय उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ही घटना घडल्यानंतर पालघर स्थानकात पोलिसांनी तत्काळ लक्ष घालून संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल केला. पुढील तपास सुरू करताच आरोपी हे वापी येथे असल्याची माहिती मिळाली आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या आरोपींविरोधात विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळ, प्रत्यक्षदर्शी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली असून, हल्ल्यामागील नेमकी कारणे आणि अन्य कुठले सहकारी आरोपी आहेत का, याची चौकशी सुरू आहे. या घटनेमुळे रेल्वेतील प्रवासी सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वे प्रशासन काय उपाययोजना करते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.