शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमामध्ये बाजी मारत पालघर जिल्हा पोलीस दल ठरलं महाराष्ट्रात नंबर वन

Spread the love

शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमामध्ये बाजी मारत पालघर जिल्हा पोलीस दल ठरलं महाराष्ट्रात नंबर वन

योगेश पांडे / वार्ताहर 

पालघर – राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामार्फत १०० दिवसांचा सात कलमी कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्र राबविण्यात आला आहे. १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमाचे भारतीय गुणवत्ता परिषदेतर्फे अंतिम मूल्यमापन करण्यात आले. या निकालानुसार वेबसाईट सुधारणा, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण, सुलभ जीवनमान, गुंतवणुकीस चालना, तंत्रज्ञानाचा वापर इत्यादी मुद्यांवर उत्कृष्ट कार्य केल्यामुळे पालघर जिल्हा पोलीस दल राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट करत सर्वोत्तम कामगिरी बजावलेल्या महाराष्ट्रातील शासकीय कार्यालयांमध्ये प्रथम क्रमांकवर असलेल्या पालघर जिल्हा दलाचे अभिनंदन केले आहे. पालघर जिल्हा पोलीस दलाला १०० पैकी ९०.२९ टक्के गुण मिळाले आहेत. तर गडचिरोली दुसऱ्या क्रमांकावर आहे. पालघर जिल्हा पोलीस दलाकडून प्रशासन लोकाभिमुख आणि गतिमान करताना वेबसाईट अद्यावत करून युजर फ्रेंडली बनवण्यात आली. नागरिकांसाठी चॅट बॉक्स सुविधा, सुकर जीवनमान अंतर्गत सायबर सुरक्षित पालघर मोहीम, एआय बेस चॅट बोट, स्वच्छता मोहीम, तक्रार निवारण दिन, ई ऑफिस कार्यप्रणाली, विजिटर मॅनेजमेंट सिस्टीम, कार्यालयीन कामकाजामध्ये एआयचा वापर, पेट्रोलिंगवर देखरेखीसाठी थर्ड आय एप्लीकेशन असे नावीन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आले.

पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनाखाली पालघर जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व अंमलदार तसेच पोलीस अधीक्षक कार्यालयातील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सात कलमी कार्यक्रम यशस्वीपणे राबवला आहे. गडचिंचले हत्या कांडानंतर स्वतःची प्रतिमा सुधारण्यात पालघर पोलिसांना यश आल्याचे मत पालघर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी व्यक्त केले असून याबाबत समाधान व्यक्त केले. सायबर गुन्हे मुक्त पालघर जिल्हा आणि जनसंवाद अभियान यांसारखे उपक्रम महत्वाचे ठरल्याचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील म्हणाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon