पुण्यात दीड कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी ८ जणांविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Spread the love

पुण्यात दीड कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी ८ जणांविरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – दारुचे व्यसन हे वाईट असे नेहमी सांगितले जाते. अति दारु पिण्याच्या नादात आपण काय करतो, याची शुद्ध नसते असे म्हणतात. दारुचे व्यसन असलेल्या तरुणाला त्याच्या कंपनीतील सहकारी व इतरांनी सतत १० दिवस दारुच्या नशेत ठेवून त्याच्या नावावर १ कोटी ५२ लाखांचे कर्ज काढले. आलेले १ कोटी २७ लाख रुपये व त्याच्या खात्यातील शिल्लक रक्कम हे सही केलेल्या कोर्‍या धनादेशाचा वापर करुन काढून घेतले. अशा प्रकारे व्यसनाधीन झालेल्या तरुणाची आठ जणांनी तब्बल १ कोटी ५३ लाख ५६ हजार ७६३ रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत एका ३९ वर्षाच्या नागरिकाने काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन प्रियंका धृव कुमार तिचा पती धृव प्रदिप कुमार, अजिंक्य सूर्यकांत जाधव, सौरभ पांडुरंग माने, दिपेंद्र ऊर्फ विष्णु भारत कुवंर, दिपना भारत कुवंर, स्वप्नील पाटील, मंगेश नायर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मगरपट्टा येथील ऑकवीन कंपनीत सिनियर अनॉलीस म्हणून नोकरी करत होते. त्यांच्या विभागामध्ये काम करणारी प्रियंका धृव कुमार व कंपनीमध्ये कस्टमर केअर विभागामध्ये काम करणारे प्रियंकाचे पती धृव कुमार यांच्याशी ओळख झाली. नोव्हेबर २०२१ मध्ये प्रियंकाने आर्थिक अडचणीचे काम सांगून २ लाखांची मागणी केली. फिर्यादी यांनी वैयक्तिक कर्ज काढून १४ लाख ९२ हजार रुपये धृव कुमारच्या खात्यावर जमा केले. धृव कुमार दर महिन्याला ईएमआयच्या हफ्त्याची रक्कम पाठवत होता. पैसे पाठवून विश्वास संपादन केला. धृव कुमार याने फेब्रुवारी २०२२ मध्ये सौरभ माने याच्याशी ओळख करुन दिली. त्याने तारापूर एमआयडीसीमध्ये स्ट्रील फॅक्टरी सध्या बंद आहे. ही बंद फॅक्टरी सुरु करण्यासाठी ६ कोटी रुपये लागणार आहेत. त्यावेळी प्रथम फॅक्टरी सुरु करण्याकरीता २ कोटींची गरज असल्याचे चौघांनी फिर्यादीला सांगितले. पण, फिर्यादीच्या नावावर कर्ज असल्याने प्रश्न होता. तेव्हा कर्ज मंजूर करुन देणार्‍या दिपेंद्र ऊर्फ विष्णु कुंवर याची ओळख करुन दिली. फिर्यादी यांना नाशिक येथील ईएसडीएस सॉफ्टवेअर सोल्युशन मध्ये सीनीयर अनॉलिस म्हणून नोकरी असून त्यांना महिन्याला दीड लाख रुपये पगार असल्याचे दर्शविणारी कागदपत्रे तयार केली. त्यांच्या नावावर एक लाखांहून अधिक पैसे बँक खात्यात जमा करण्यात येऊ लागले. ते पैसे नंतर धृव कुमार याच्या सांगण्यानुसार इतरांना दिले जात होते. त्यानंतर ११ मे २०२२ मध्ये प्रियंका, धृव कुमार, सौरभ माने हे फिर्यादी यांच्या घरी राहण्यास आले. ११ ते २५ मे या दरम्यान त्यांनी फिर्यादी यांना सातत्याने दारुच्या नशेत ठेवले. त्यांनी फिर्यादी यांच्या मोबाईल पासवर्ड, बँक पासवर्ड याची माहिती घेऊन त्यावरुन ९ बँका व फायनान्स कंपन्यांकडून १ कोटी ५२ लाख ८५ हजार २०४ रुपयांचे पर्सनल कर्ज घेतले. या कर्जाचे आलेले १ कोटी २७ लाख ९४ हजार ७५९ रुपये व फिर्यादीच्या बँक खात्यामधील शिल्लक रक्कम तसेच त्यांच्या सह्या केलेल्या कोरे धनादेश याचा वापर करुन त्यांच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या खात्यात ट्रान्सफर करुन १ कोटी ५३ लाख ५६ हजार ७६३ रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. फिर्यादी हे सध्या काहीही काम करत नसून दुसर्‍याकडे रहात आहेत. पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon