ठाण्यातील रायलादेवी तलावामध्ये बुडून १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – वागळे इस्टेटमधील रायलादेवी तलावामध्ये बुडून साहिल घोरपडे (१८) या तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी रात्री उशिरा तलावातून त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. साठेनगरमध्ये राहणारा साहिल हा रविवारी सायंकाळी मित्रांसोबत रायलादेवी तलावामध्ये पोहण्यासाठी गेला होता. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो तलावात बुडाला. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस, अग्निशमन दलाचे जवान, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले.
या पथकांनी अंडरवॉटर टेलिस्कोप कॅमेरा आणि थर्मल स्कॅनरच्या सहाय्याने साहिलचा तलावात अंदाजे दीडतास शोध घेतला. परंतु, अंधार पडल्याने शोधकार्यामध्ये अडथळा येऊ लागल्याने तात्पुरत्या स्वरुपात शोधकार्य थांबवण्यात आले. पुन्हा रात्री उशिरा १२.३० वाजता शोधकार्य सुरु करण्यात आले. दोन तासांच्या प्रयत्नानंतर साहिल याचा मृतदेह तलावातून बाहेर काढण्यात आला. या घटनेने परिसरात शोककळा पसरली असून तरुणाच्या जाण्याने हळहळ व्यक्त होत आहे.