पुणे हादरवणाऱ्या बोपदेव घाट अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट, अखेर पोलिसांना यश
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – बोपदेव घाट येथे साडेसहा महिन्यांपूर्वी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील फरार आरोपीला पुणे ग्रामीणच्या वालचंदनगर पोलिसांनी शनिवारी अकलूज परिसरातून पकडले. सूरज ऊर्फ बापू गोसावी असे आरोपीचे नाव आहे. दरम्यान, यापूर्वी गुन्हे शाखेने रवींद्रकुमार कनोजिया आणि अख्तर अली शेख (२८) यांना अटक केली होती. त्या वेळी गोसावी हा फरार झाला होता. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक गोसावीच्या मागावर होते. त्याची ओळख पोलिसांनी पटवली होती. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता. वालचंदनगर पोलिसांचे पथक एका खुनाच्या गुन्ह्याचा तपास करत असताना, त्यांना गोसावीची माहिती मिळाली. त्यांनी सापळा लावून गोसावीला ताब्यात घेतले. त्यानंतर ग्रामीण पोलिसांच्या पथकाने गोसावीला पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे सुपूर्द केले.
बोपदेव घाटात मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या महाविद्यालयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केला होता. ही घटना तीन ऑक्टोबर २०२४ ला रात्रीच्या वेळेस घडली होती. शहर पोलिसांची सुमारे ६० पथके आरोपींचा शोध घेत होती. पोलिसांनी बोपदेव घाट परिसरातील ४५ गावे, वाड्या-वस्त्यांवरील ४५० सराईत गुन्हेगारांची चौकशी केली होती. आरोपींची ओळख पटवून पोलिस त्यांच्या मागावर होते. १० ऑक्टोबरला आरोपी कनोजियाला येवलेवाडी परिसरातून अटक करण्यात आली. चौकशीत आरोपी अख्तर शेख उत्तर प्रदेशातील प्रयागराजजवळ असलेल्या मूळगावी पसार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने शेखला उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत अटक केली होती. दरम्यान, शनिवारी कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गोसावी अकलूज येथील जुन्या बस स्थानक परिसरात असल्याची माहिती वालचंदनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार वालचंदनगर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. ही कामगिरी वालचंदनगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार डुणगे, पोलिस हवालदार गुलाबराव पाटील, शैलेश स्वामी, सचिन गायकवाड, अभिजित कळसकर, विक्रमसिंह जाधव, गणेश वानकर यांनी केली. गोसावी हा घटनेनंतर फरार झाला होता. पुणे पोलिसांना त्याची माहिती मिळत नव्हती. त्यात तो मोबाइल वापरत नसल्याने पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी होत होता.