मराठी एकीकरण समितीचा विरोध डावलून डिंपल मेहता मीरा-भाईंदरच्या महापौरपदी

Spread the love

मराठी एकीकरण समितीचा विरोध डावलून डिंपल मेहता मीरा-भाईंदरच्या महापौरपदी

पोलीस महानगर नेटवर्क

मीरा-भाईंदर : राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुकांनंतर आता महापौरपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू असून, मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील घडामोडींमुळे शहरातील राजकारण तापल्याचे चित्र आहे. ‘मराठी महापौर’ या मुद्द्यावर मराठी एकीकरण समितीने आक्रमक भूमिका घेतली असतानाही भाजपच्या उमेदवार डिंपल मेहता यांची महापौरपदी निवड निश्चित झाली आहे.

मीरा-भाईंदर महानगरपालिकेत महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत भाजपने एकगठ्ठा मतदान करत डिंपल मेहता यांच्या पारड्यात स्पष्ट बहुमत टाकले. अर्ज मागे घेण्याच्या मुदतीत एकाही उमेदवाराने अर्ज मागे न घेतल्याने थेट मतदान झाले. भाजपचे सर्व ७८ नगरसेवक आणि एका अपक्ष नगरसेवकाने डिंपल मेहता यांच्या बाजूने मतदान केले. परिणामी त्यांना एकूण ७९ मते मिळाली.

काँग्रेसच्या महापौरपदाच्या उमेदवार रुबीना शेख यांच्या बाजूने मीरा-भाईंदर विकास आघाडीच्या १६ नगरसेवकांनी मतदान केले. त्यामुळे रुबीना शेख यांना १६ मते मिळाली. मतांच्या स्पष्ट फरकामुळे डिंपल मेहता ७९ मतांनी महापौरपदी विराजमान झाल्या.

दरम्यान, उपमहापौरपदासाठी भाजपकडून ध्रुवकिशोर पाटील यांना देखील ७९ मते मिळाली असून ते उपमहापौरपदी निवडून आले आहेत.

महापौरपदाच्या निवडीनंतर शहरातील वातावरण अधिकच तापले आहे. ‘मीरा-भाईंदरला मराठी महापौरच हवा’ या मागणीसाठी मराठी एकीकरण समिती, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह विविध मराठी संघटना आक्रमक झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज मराठी एकीकरण समितीकडून महापालिकेच्या बाहेर आंदोलन करण्यात आले.

मीरा-भाईंदर महापालिकेवर अमराठी महापौर बसण्याची ही पहिलीच वेळ ठरणार असून, या निर्णयामुळे शहरातील राजकारणाने नवे आणि वादग्रस्त वळण घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘मराठी महापौर’ या मुद्द्यावर पुढील काळात संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon