सायबर चोरट्याकडून अटकेची भीती दाखवून ग्राफीक डिझायनरची फसवणूक, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
मुंबई – राज्यात सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. दररोज शेकडो गुन्हे पोलीस ठाण्यात दाखल होत आहेत. सायबर चोरट्यांच्या भीतीपोटी काही नागरिक आपल्या आयुष्याची पुंजी देऊन मोकळे होतात. पोलिसांनी वेळोवेळी आवाहन करून देखील नागरिक बळी पडताना दिसत आहेत. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. तैवानला पाठवण्यात येणाऱ्या पार्सलमध्ये अमली पदार्थ सापडले असून त्याप्रकरणी अटकेची भीती दाखवून अंधेरीमधील ४८ वर्षीय ग्राफिक डिझायनरची १५ लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली आहे. फसवणूक करण्यासाठी आरोपींनी विविध पोलीस, सीमाशुल्क अधिकाऱ्यांच्या नावाने तक्रारादाराशी संपर्क साधला. याप्रकरणी पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणी पोलीस बँक व्यवहारांच्या माध्यमातून वेगवेगळ्या शक्यता पडताळून पहात आहेत.
तक्रारदार ग्राफिक डिझायरन असून एका ऑनलाइन मार्केटिंग कंपनीत कार्यरत आहे. आरोपींनी फसवणूक करण्यासाठी उपायुक्त दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर केला. तक्रारीनुसार १७ मार्च रोजी तक्रारदाराला कुरियर कंपनीच्या नावाने दूरध्वनी आला होता. तुमच्या नावाने तैवानला जाणारे पार्सल सीमाशुल्क विभागाने पकडले असून त्यात पारपत्र, क्रेडिट कार्ड, लॅपटॉप व ५०० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अमली पदार्थ सापडल्याचे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने सांगितले. ते पार्सल आपण पाठवले नसल्याचे तक्रारदाराने सांगितले. याप्रकरणी सायबर क्राईम विभागाला तक्रार करावी लागले, असेल समोरच्या व्यक्तीने तक्रारदारांना सांगितले. त्यानंतर संबंधित दूरध्वनी दुसऱ्या व्यक्तीकडे वळवण्यात आला. त्याने आपण सायबर क्राईम विभागाचे उपायुक्त बालसिंह राजपूत बोलत असल्याचे सांगितले. आरोपीने तुमच्या आधार कार्डच्या माध्यमातून तुमची ओळख चोरली आहे. हा आयडेंटिटी थेफ्टचा प्रकार असून त्याबाबत तक्रार करावी लागेल असे सांगितले. त्यानंतर तपासणी करून संबंधित अधिकाऱ्याने तुमच्या आधार कार्डद्वारे विविध राज्यांमध्ये फसवणूक करण्यात आल्याचे सांगितले. तक्रारदाराला स्काईपवरून व्हिडिओ कॉल आला. त्यावेळी तेथे असलेल्या व्यक्तीच्या मागे मुंबई सायबर क्राईम डिपार्टमेंट असा लोगो होता. त्याने केंद्रीय अन्वेषण विभागाकडील (सीबीआय) अमलीपदार्थ तस्करी व आर्थिक गैरव्यवहारात तुमचा सहभाग असल्याचे सांगितले. तक्रारदारांना आर्थिक गैरव्यवहार हाताळणारे पोलीस अधिकारी जॉर्ज मॅथ्यू यांच्या स्काईपवरून व्हिडिओ कॉल आला. त्याने तुमच्याविरोधात विविध गुन्हे दाखल असून त्याप्रकरणी अटकेची भीती दाखवली. तसेच अटक टाळायची असेल, तर तुमच्या बँक खात्यात शिल्लक असलेल्या रकमेपैकी ८८ टक्के रक्कम जमा करावी लागले, असे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने चार विविध व्यवहारांद्वारे एकूण १५ लाख रुपये चार बँक खात्यात जमा केले. त्या रकमेची पडताळणी करून पुन्हा संपर्क साधण्याचे आश्वासन तक्रारदारांना देण्यात आले होते. पण त्यानंतर तक्रारदाराला दूरध्वनी आला नाही. अखेर तक्रारदाराने याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याप्रकरणी माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपींचा शोध सुरू आहे