ऊसाचा फडात चक्क गांजाचा मळा; कोल्हापूर पोलिसांकडून तब्बल दीड लाखांचा ओला गांजा जप्त, शेतमालक ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
कोल्हापूर – कोल्हापुरात ओपन बार आणि गांजाचा धूर जोरात असतानाच कोल्हापूर पोलिसांकडून मोठी कारवाई करताना थेट ऊसाच्या शेतातून तब्बल १५ किलो गांजा जप्त करण्यात आला. करवीर तालुक्यातील शेळकेवाडी ते वाशी जाणाऱ्या रोडवर विठलाई परिसरातील ऊसाच्या शेतात एका इसमाने गांजाची काही झाडे लावल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार वैभव पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पीआय रविंद्र कळमकर यांनी त्यांच्या पथकासह सदर ठिकाणी छापा टाकला. पथकाने ऊस शेतीचा मालक जयदीप यशवंत शेळके (४२) यास ताब्यात घेतले. ऊस शेतीमध्ये काही गांजाची झाडे मिळून आल्याने सदरबाबत दोन पंचासमक्ष कायदेशीर प्रक्रिया करून एकूण १५ किलो वजनाचा ओला गांजा व इतर साहित्य असा एकूण दीड लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयित आरोपी जयदीप शेळकेला ताब्यात घेत करवीर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास करवीर पोलीस ठाणे करीत आहेत.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक, महेंद्र पंडित, अपर पोलीस अधीक्षक, डॉ. बी धीरज कुमार यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, पोलीस अमंलदार वैभव पाटील, अरविंद पाटील, महेंद्र कोरवी, परशुराम गुजरे, गजानन गुरव, अशोक पोवार, राजु येडगे, योगेश गोसावी, प्रदिप पाटील, विशाल खराड शिवानंद मठपती, अमित सर्जे, नामदेव यादव, संतोष बरगे, महादेव कुराडे, अमोल कोळेकर, यशवंत कुभार यांनी केली.