वाशिममध्ये पती-पत्नीच्या मृत्यूने खळबळ; चारित्र्याच्या संशयावरुन संसाराचा भयंकर अंत

Spread the love

वाशिममध्ये पती-पत्नीच्या मृत्यूने खळबळ; चारित्र्याच्या संशयावरुन संसाराचा भयंकर अंत

योगेश पांडे / वार्ताहर 

वाशिम – चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीची धारधार शस्त्राने निर्घृण हत्या केली. त्यानंतर पतीनेही गळफास घेतल्याची खळबळजनक घटना वाशिममध्ये घडली आहे. वाशिमच्या मंगरुळपिर तालुक्यातील पिंप्री बुद्रुक गावात ही भयंकर घटना उघडकीस आली. या घटनेने सारेच हादरुन गेले आहेत. वाशिमच्या मंगरुळपिर तालुक्यातील पिंप्री बुद्रुक येथील गौतम वर (५२) आणि त्यांची पत्नी ज्योती वर (४५) यांच्यामध्ये रात्रीच्या सुमारास जोरदार भांडण झालं. त्यानंतर संतप्त झालेल्या पती गौतम वर याने पत्नी ज्योती हिच्यावर तीक्ष्ण विळ्याने आणि लोखंडी रॉडने जबर वार करून तिची हत्या केली.

त्यानंतर पती गौतम वर याने घरा शेजारील टिनाच्या शेडमध्ये गळफास घेत आपला जीव दिला. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी अरज यांनी मंगरूळपिर पोलिस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह घटनास्थळी दाखल होत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले, शवविच्छेदनासाठी मंगरुळपिर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहेत. घटनास्थळी पोलिसांना एक चार ओळीची चिठ्ठी मिळाली आहे. ही चिठ्ठी आपली जीवनयात्रा संपवलेल्या गौतम वर याने लिहिली असावी असा संशय व्यक्त केला जात असून एका संशयिताला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

मृतक गौतम आणि ज्योती यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलीचा विवाह झाला असून मुलगा कामानिमित्त बाहेरगावी राहतो. पत्नीच्या चरित्रावर संशय घेऊन उचललेल्या टोकाच्या पावलामुळे दोन्ही मुले अनाथ झाली आहेत. तर पिंप्री बुद्रुक गावात घडलेल्या पती पत्नीच्या दुहेरी मृत्यूमुळे हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेचा तपास मंगरुळपिर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुधाकर आडे यांच्या सह त्यांची चमू करत आहे. या प्रकरणातील एक चार ओळीची चिट्ठी पोलिसांनी जप्त करत एकाला ताब्यात घेतलं असून पुढील तपास मंगरुळपिर पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon