कल्याण डोंबिवली पालिकेला लाचखोरीची कीड, लाच स्वीकारताना कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

Spread the love

कल्याण डोंबिवली पालिकेला लाचखोरीची कीड, लाच स्वीकारताना कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – कल्याण डोंबिवली पालिकेतीला लाचखोरीची कीड लागली की काय अशा घटना वारंवार घडत आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आतापर्यंत किमान ४५ कर्मचारी लाचखोरीच्या विळख्यात सापडले आहेत. लाचखोरी केल्यानंतर प्रशासनाकडून निलंबनाची कारवाई होते. नोकरीच्या गोपनीय पुस्तकात लाल शेऱ्याची नोंद होते. हे माहिती असुनही कल्याण डोंबिवली पालिकेतील कर्मचाऱ्यांची लाचखोरी थांबता थांबत नाही. बुधवारी कल्याण डोंबिवली पालिकेच्या आय प्रभागातील विवाह नोंदणी विभागातील कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात दीड हजार रूपयांची लाच घेताना रंगेहाथ सापडला.

संतोष गजानन पाटणे (५२) असे लाच घेताना पकडलेल्या गेलेल्या लिपिकाचे नाव आहे. ते पालिकेच्या कल्याण पूर्वेतील खडेगोळवली भागातील आय प्रभागात नागरी सुविधा केंद्रातील विवाह नोंदणी विभागात कार्यरत होते. विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र लवकरात लवकर देण्यासाठी संतोष पाटणे यांनी तक्रारदाराकडे दोन हजार रूपयांची लाच मागितली होती. महात्मा फुले पोलीस ठाण्यात संतोष पाटणे यांच्या विरुध्द लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाचे पोलीस निरीक्षक सचिन मोरे यांनी तक्रार केली आहे. पोलिसांनी पाटणे यांच्या विरुध्द लाचखोरीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यातील तक्रारीत पोलीस निरीक्षक मोरे यांनी म्हटले आहे की, तक्रारदार यांनी त्यांच्या मानलेल्या भावाचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी पालिकेच्या आय प्रभागातील नागरी सुविधा के्ंद्रात अर्ज केला होता. अर्जामधील साक्षीदार हे मानलेल्या भावाचे जवळचे नातेवाईक आणि स्थानिक नसल्याने या अर्जात पाटणे यांनी त्रृटी काढली होती. साक्षीदार न बदलता विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र लवकर हवे असेल तर आपणास दोन हजार रूपये द्यावे लागतील अशी मागणी लिपिक संतोष पाटणे यांनी तक्रारदाराकडे केली होती.

तक्रारदाराने पाटणे यांची लाचलुचपत प्रतिबंधक ठाणे विभागाकडे तक्रार केली होती. या तक्रारीची खात्री केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक पथकाला पाटणे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले होते. तडजोडीने ही रक्कम दीड हजार रूपये स्वीकारण्याचे पाटणे यांनी कबुल केले होते. बुधवारी आय प्रभागात पाटणे यांनी तक्रारदाराकडून दीड हजार रूपयांची रक्कम स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्यांना रंगेहाथ पकडले. नवनियुक्त आयुक्त अभिनव गोयल कल्याण डोंबिवली पालिकेत पदभार स्वीकारण्यासाठी दाखल होताच, ही घटना घडली. प्रत्येक आयुक्त पदाच्या काळात दरवर्षी किमान दोन पालिका कर्मचारी नियमित लाच घेताना पकडले जातात. फेब्रुवारीमध्ये पालिकेतील बाजार परवाना विभागातील लिपिक प्रशांत धिवर यांना व्यावसायिक दुराज आंबिलकर यांच्याकडून दीड लाखाची लाच घेताना पथकाने रंगेहाथ पकडले होते. गेल्या २५ वर्षापासून पालिकेत दरवर्षी एक ते दोन जण लाच घेताना पकडले जातात. संतोष पाटणे हे तक्रारदाराकडून लाच स्वीकारणारे ४५ वे कर्मचारी आहेत. कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई होऊन देखील याप्रकरणी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील कर्मचारी कोणताच बोध घेणार नसतील तर मग कठीणच असल्याचे मत अनेक नागरिकांना व्यक्त केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon