मुंबईतील आमदार निवासात भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू, रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने मृत्यू झाल्याचा अंदाज
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे तनिषा भिसे यांचा मृत्यू झाला हे प्रकरण ऐरणीवर असतानाच अजून एक धक्कादायक प्रकार समोर येत आहे. आमदार निवासातून वारंवार फोन जाऊनही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. त्यामुळे चंद्रकांत धोत्रे यांचे निधन झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना हृदयविकाराच्या तीव्र वेदना होत होत्या. मात्र वेळीच उपचार उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. मंत्रालयाच्या जवळ आकाशवाणी येथील आमदार निवासातील रुम नं ४०८ ही आमदार विजय देशमुख यांची खोली होती. तेथे मुंबईत कामानिमित्त आलेले चंद्रकांत धोत्रे वास्तव्यास होते. रात्री १२.३० च्या सुमारास त्यांना हृदयविकाराच्या वेदना जाणवू लागल्या. त्यावेळी रुग्णवाहिकेसाठी वारंवार फोन करण्यात आला मात्र कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नाही. अखेर पोलिसांना फोन करण्यात आला. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या वाहनातून जीटी रुग्णालयात नेण्यात आले मात्र तेथे नेल्यावर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आमदार निवासातील फोन गेल्यानंतर रुग्णवाहिका उपलब्ध होत नसेल तर सर्वसामान्यांच काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
चंद्रकांत धोत्रे यांच्या कुटुंबियांनी यासंबंधी कोणतीही तक्रार दाखल केली नाही. त्यामुळे पोलिसांनी या घटनेसंबंधी कोणतीही कारवाई केली नाही. धोत्रे यांचे नातेवाईक त्यांचा मृतदेह गावी घेऊन जाण्यासाठी रवाना झाले आहेत.चंद्रकांत धोत्रे यांचा मुलगा विशाल धोत्रे हा आमदार विजयराव देशमुख यांचा कार्यकर्ता आहे. चंद्रकांत धोत्रे हे बैठकीनिमित्त मुंबईत आले होते. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे.