सीसीटीव्ही–तांत्रिक तपासातून नवी मुंबईत वाहनचोर टोळ्यांचा पर्दाफाश
पोलीस महानगर नेटवर्क
नवी मुंबई : मोटारसायकल व रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आणि संघटित टोळ्यांविरोधात नवी मुंबई मध्यवर्ती गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत तब्बल ४०.४६ लाख रुपये किमतीची २६ चोरीची वाहने जप्त केली आहेत. या कारवाईमुळे २३ गुन्हे उघडकीस आले असून डोंबिवली परिसरातून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.
खारघर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या गुन्ह्याच्या समांतर तपासात गुन्हे शाखेच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे आरोपींचा माग काढला. तपासात आरोपी सोशल मीडियावरील वाहन चोरीचे व्हिडीओ पाहून चोरीची पद्धत आत्मसात करत असल्याचे निष्पन्न झाले. चोरीनंतर वाहने बनावट नंबर प्लेट लावून विक्री केली जात होती. या कारवाईत २१ मोटारसायकल व ५ रिक्षा हस्तगत करण्यात आल्या आहेत. पोलीस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली.
दरम्यान, नवी मुंबई गुन्हे शाखेने आणखी एका स्वतंत्र कारवाईत मोटारसायकल चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक करून १४ गुन्हे उघडकीस आणले आहेत. अटक करण्यात आलेला आरोपी नासीर सद्दन खान (वय ५८) हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी ९२ हून अधिक वाहन चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तांत्रिक तपास व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे वाशी परिसरातून सापळा रचून त्याला अटक करण्यात आली.
तपासादरम्यान आरोपीकडून १७ चोरीच्या मोटारसायकली (अंदाजे किंमत ₹५.८२ लाख) जप्त करण्यात आल्या. चोरी केलेल्या वाहनांचे इंजिन व चेसिस क्रमांक खोडून विक्री केल्याचेही उघड झाले आहे. या प्रकरणात खारघर व एपीएमसी पोलीस ठाण्यांतील गुन्ह्यांचा समावेश असून गुन्हे शाखेच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
या सलग कारवायांमुळे नवी मुंबईत सक्रिय असलेल्या वाहनचोर टोळ्यांना मोठा धक्का बसला असून, पोलिसांच्या तांत्रिक तपास क्षमतेचे महत्त्व अधोरेखित झाले आहे.