मुंब्रा येथील बिल्डींगच्या व्हेंटिलेशन डक्ट मध्ये सापडला अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न मृतदेह; सम्राट नगर भागात खळबळ

Spread the love

मुंब्रा येथील बिल्डींगच्या व्हेंटिलेशन डक्ट मध्ये सापडला अल्पवयीन मुलीचा अर्धनग्न मृतदेह; सम्राट नगर भागात खळबळ

योगेश पांडे / वार्ताहर 

ठाणे – मुंब्रा येथील एका १० मजली रहिवासी इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये एका अल्पवयीन मुलीचा अर्धन्गन मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्याने प्रचंड खळबळ माजली आहे. मंगळवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. मुंब्रा येथील सम्राट नगर भागातील श्रद्धा इमारतीत घडलेल्या या दुर्दैवी घटनेची माहिती सोमवारी रात्री ११.४८ च्या सुमारास ठाणे महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला देण्यात आली. मात्र ही मृत मुलगी या इमारतीची रहिवासी नव्हती, मग ती त्या इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये कशी पडली असावी असा प्रश्न सध्या सर्वांच्या मनात असून ती ज्या परिस्थितीत सापडली, त्यामुळे अनेक शंका व्यक्त होत आहेत. ही अल्पवयीन मुलगी नेमकी त्या परिसरात कशी सापडली. ती तेथे का गेली होती या सर्व बाबींचा तपास सुरू आहे. ती मुलगी अर्धनग्न अवस्थेत होती. या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. तर मुलीचा मृतदेह सापडल्याचे वृत्त समजताच आजूबाजूच्या लोकांची गर्दीही घटनास्थळी जमू लागली. हा अपघात होता की कोणीतरी ही घटना घडवून आणली? हे अद्याप काहीही कळू शकले नाही. याशिवाय, त्या मुलीवर काही अत्याचार झाला आहे की नाही याचाही पोलिस शोध घेत आहेत. मृत मुलगी ही ठाकूर पाडा परिसरातील रहिवासी होती, अशी माहिती समोर आली आहे.

ज्या इमारतीच्या व्हेंटिलेशन डक्टमध्ये त्या मुलीचा मृतदेह सापडला, त्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर राहणारा इरफान म्हणाला, की पाणी येत नव्हते. काहीतरी जोरात पडल्याचा आवाजा आला, तेव्हा वाटलं की कदाचित पाण्याचा पाईप तुटला असेल. मी खिडकी उघडून पाहिले तर तिथे एका ९ ते १० वर्षांच्या मुलीचा मृतदेह पडलेला होता, असं त्याने सांगितलं. मुंब्रा पोलिस स्टेशन, अग्निशमन विभागाचे पथक, प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि एक खाजगी रुग्णवाहिका यासह आपत्कालीन सेवा घटनास्थळी पोहोचल्या. शाफ्टच्या अरुंद रचनेमुळे आव्हानात्मक बचाव कार्य होते, मात्र अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून मुलीला बाहेर काढला. त्यानंतर त्या मुलीला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात नेण्यात आले, पण तिथे डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. मुंब्रा पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून घटनेचा तपास सुरू केला आहे. मात्र ती अवघ्या १० वर्षांची मुलगी त्या धोकादायक शाफ्टपर्यंत कशी पोहोचली, ती तिथे का गेली होती याचा कसून तपास करण्यात येत आहे. ‘ही एक अतिशय दुर्दैवी घटना आहे. उंच इमारतींमध्ये, विशेषतः जिथे मुले असतात, तिथे अशा उघड्या व्हेंटिलेशन डक्टच्या सुरक्षिततेचा गांभीर्याने पुनर्विचार केला पाहिजे’ असे बचाव कार्यात सहभागी असलेल्या एका अधिकाऱ्याने सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon