धक्कादायक ! केडीएमसीच्या प्रसूती रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू 

Spread the love

धक्कादायक ! केडीएमसीच्या प्रसूती रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेचा मृत्यू 

केडीएमसीच्या आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

पोलीस महानगर नेटवर्क

कल्याण – कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रुग्णालयात असलेली आरोग्य व्यवस्था सुधारणा होण्याऐवजी दिवसेंदिवस मरणावस्थेत जात आहे. यांच्या रुग्णालयात दाखल होणारा रुग्ण पुन्हा बरा होऊन जाईल की नाही याची शाश्वती कुणीच देऊ शकणार नाही, अशी भावना नागरिकांची आहे. पुण्यातील मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिलेचा झालेल्या मृत्यूची घटना ताजी असतानाच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रसुती रुग्णालयातही एका दोन महिन्याच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. रुग्णालयातील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या नातेवाईकांनी केला असून कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाने मात्र आरोप फेटाळून लावला आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या कल्याण पूर्वेतील शक्तीधाम रुग्णालयात कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेसाठी सदर महिलेला दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याची घटना घडल्याने पालिकेच्या आरोग्य यंत्रणेवर प्रश्न निर्माण झाले आहेत. शांतीदेवी मौर्या (३०)असे या महिलेचे नाव असून ती कल्याण पूर्वेतील खडेगोळवली परिसरात कुटुंबासह राहत होती. शुक्रवारपासून तिच्या पोटात दुखत असल्याने तिला नजीकच्या कोळसेवाडी परिसरातील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शक्तीधाम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात दाखल केल्यापासून तिची प्रकृती खालावली असल्याने तिला रक्तही चढविण्यात आले होते. त्यानंतर प्रकृती सुधारल्याने सोमवारी कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र काही वेळातच अचानकपणे तिची प्रकृती खालावली. महिलेची प्रकृती बिघडत असल्याने तिला जवळच्या खासगी रुग्णालयात नेण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. मात्र, रुग्णवाहिका रस्त्यात असताना शांतीदेवी मौर्या यांचा मृत्यू झाला. त्यांच्या या मृत्यूला डॉक्टर जबाबदार असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. शांतीदेवी यांच्या पतीने सांगितले की, आपल्या पत्नीच्या पोटात दुखत असल्याने किडनी स्टोन असल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. या ठिकाणी किडनी स्टोनचे ऑपरेशन केले जाईल असे सांगून या रुग्णालयात शांतीदेवीला शुक्रवारी शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले होते.

कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, सदर महिला कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेसाठी आली होती. ही शस्त्रक्रिया करण्यापूर्वी भुलीचे इंजेक्शन दिल्यानंतर त्यांची तब्येत बिघडली. तिला त्रास वाढल्यानंतर या महिलेला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे ठरवण्यात आले. त्यानुसार खासगी रुग्णालयात उपचारसाठी नेले असताना तिचा मृत्यू झाल्याची पमाहीती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉ. दिपा शुक्ल यांनी दैनिक ‘पोलीस महानगर’ शी बोलताना दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon