वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या बनावट सही व शिक्क्यांचा वापर करून वेटर करायचा तिकिटे कन्फर्म; रेल्वेच्या दक्षता पथकाकडून भांडाफोड करत आरोपीला अटक

Spread the love

वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या बनावट सही व शिक्क्यांचा वापर करून वेटर करायचा तिकिटे कन्फर्म; रेल्वेच्या दक्षता पथकाकडून भांडाफोड करत आरोपीला अटक

योगेश पांडे / वार्ताहर 

मुंबई – आरक्षणाचे तिकीट कन्फर्म मिळवणे एक आव्हानात्मक काम असते. एजंट, तत्काल कोटा या सर्वांचा वापर करुनही तिकीट कन्फर्म मिळत नसल्यावर व्हीआयपी कोट्याचा वापर काही जण करतात. त्याचा फायदा उचलत रेल्वेच्या मुंबईतील सीएसटीएम कॅटीनमध्ये वेटर असलेल्या व्यक्तीने गोरखधंदा सुरु केला. त्यातून महिन्याला लाखो रुपयांची कमाई केली आहे. वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या बनावट सही व शिक्क्यांचा वापर करून व्हीआयपी कोट्यातून तिकिटे तो कन्फर्म करत होता. अखेरी रेल्वेच्या दक्षता पथकाने त्याचा भांडाफोड केला.

मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी टर्निमसवर असलेल्या रेल्वे कॅटीनमध्ये रवींद्रकुमार साहू वेटर आहे. तो वरिष्ठ अधिकाऱ्यांना चहा देण्याचे काम करत होता. त्याने वरिष्ठ विभागीय वित्त व्यवस्थापक, मुख्य वैद्यकीय अधीक्षक आणि मुख्य अभियंता यांचे बनावट सही शिक्के तयार करुन घेतले. त्यानंतर प्रवाशांची तिकिटे कन्फर्म करण्यासाठी येणारी विनंतीपत्रासाठी तो या शिक्क्यांचा वापर करत होता. त्यानंतर त्यांची बनावट सही करत होता. व्हीआयपी कोट्यातून तिकीट कन्फर्म करण्याच्या मोबदल्यात तो महिन्याला दीड ते दोन लाखांची कमाई करत होता. त्याने व्हीआयपी कोट्यावर डल्ला मारत मोठा घोटाळा केला.

बनावट सही-शिक्क्यांतून व्हीआयपी कोट्यावर डल्ला मारत महिन्याला लाखोंची कमाई तिकीट विक्रीतून रवींद्रकुमार साहू करत होता. प्रवाशांकडून तो तिकिटांचे हजारो रुपये घेऊन महिन्याकाठी दीड-दोन लाखांची कमाई करत होता. कोलकाता मेलच्या तपासणीत दरम्यान त्याचा फसवणुकीचा सुगावा लागला. कोलकाता मेलमधील प्रवाशांची तिकिटे तपासताना मध्य रेल्वेचे मुख्य दक्षता निरीक्षक जितेंद्र शर्मा आणि आर.एस. गुप्ता यांच्या पथकाला काही प्रवाशांनी आम्ही जास्त पैसे देऊन तिकीट कन्फर्म केल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांची चौकशी केली. त्यातून रवींद्र साहू याचा व्हीआयपी कोट्याचा गैरवापरचा घोटाळा उघड झाला.

प्राथमिक चौकशीत तीन महिन्यांपासून त्याने हा प्रकार केल्याचे सिद्ध झाले. परंतु प्रत्यक्षात दोन वर्षांपासून तो फसवणूक करत असल्याचा संशय आहे. त्याची यूपीआय खात्याची तपासणी केल्यावर महिन्याला लाखोंची कमाई केल्याचे उघड झाले. दक्षता निरीक्षकांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon