सराईत चोरटा अटकेत; अँटॉपहिल पोलिसांच्या कारवाईत ३ गुन्ह्यांचा उलगडा, लाखोंचा ऐवज हस्तगत
मुंबई – अन्टॉपहिल पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या एका सराईत आरोपीस अटक केली असून त्याच्याकडून एकूण तीन पोलीस ठाण्यांतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्यात आले आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव निखिल अनिल कांबळे (वय २९) असे असून तो वाशी नाका, चेंबूर येथे वास्तव्यास आहे. गुन्हा उघडकीस आणण्यासाठी पोलिसांनी ६५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. आरोपीचे हालचाल क्षेत्र निश्चित करून साठेनगर, मानखुर्द येथे सापळा रचण्यात आला. पोलिसांनी विविध वेषांमध्ये कारवाई करत २ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ९ वाजता सापळा लावला आणि दुपारी १ वाजता आरोपीला शिताफीने अटक केली.
तपासादरम्यान निखिल कांबळे याने अँटॉपहिल, सायन आणि व्ही.बी. नगर पोलीस ठाण्यांमधील घरफोडीच्या गुन्ह्यांची कबुली दिली. अँटॉपहिल गुन्हा क्रमांक १११/२०२५ प्रकरणात चोरीस गेलेली १.१७ लाखांची संपूर्ण मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. सायन पोलीस ठाण्यातील गुन्ह्यातून ८८ हजार रुपयांचा ऐवज हस्तगत झाला आहे, तर व्ही.बी. नगर पोलीस ठाण्याच्या प्रकरणाचा तपास सुरू आहे. निखिल कांबळे याच्यावर आधीपासूनच मुंबईतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २० घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्याने शहरातील इतर भागांमध्येही गुन्हे केल्याचा संशय असून पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस आयुक्त श्री. विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त श्री. देवेन भारती, पोलीस सह आयुक्त (कायदा व सुव्यवस्था) श्री. सत्यनारायण चौधरी, अप्पर पोलीस आयुक्त (मध्य प्रादेशिक विभाग) श्री. अनिल पारसकर, मा. पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ०४) श्रीमती रागसुधा आर., सहायक पोलीस आयुक्त (सायन विभाग) श्री. शैलेंद्र धिवार, तसेच अँन्टॉपहिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर ढाणे आणि पोलीस निरीक्षक सौ. अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या कारवाईत गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी मदने, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप पाटील आणि त्यांच्या पथकातील अंमलदार गणेश घुगे, रामेश्वर आंधळे, गोपाळ टेळे, विक्रम कुंभार, सागर गस्ते, गोविंद टोके, सचिन विसपुते, सुरज किरतकर, अक्षय सजगणे, दिनेश पाटील, समाधान ठाकर, कुमार पाथरूड, सुधीर माने, निलेश माने, परमेश्वर राऊत आणि अनिल गाडगे यांनी महत्वाची भूमिका बजावली.