बबन गिते गँगने बीड जेलमध्येच डाव साधला, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण, सुरेश धस यांचा दावा

Spread the love

बबन गिते गँगने बीड जेलमध्येच डाव साधला, वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण, सुरेश धस यांचा दावा

योगेश पांडे / वार्ताहर 

बीड – बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा आणि खंडणीचा आरोप असलेल्या वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला आहे. बीड जिल्हा कारागृहात सोमवारी सकाळी १०.३० वाजताच्या सुमारास बबन गिते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी यांच्यात मारामारी झाली. यामध्ये वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला जेलमध्ये असणारा गिते गँगचा समर्थक महादेव गितेकडून मारहाण करण्यात आली, असा दावा सुरेश धस यांनी केला आहे. मकोका कायद्याअंतर्गत आरोपी असलेला वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुले हे दोघे सध्या बीडच्या कारागृहात कैद आहेत. बीडच्या जेलमध्ये सोमवारी सकाळी नाश्ताच्या वेळी बंदी उठवल्याने सर्व कैदी बाहेर मोकळे होते. त्यावेळी महादेव गिते आणि अक्षय आठवले हे दोघेजण वाल्मिक कराड याच्या अंगावर धावून गेले. तेव्हा बाजुलाच असणारा सुदर्शन घुले वाल्मिक कराडच्या मदतीसाठी धावून आला. मात्र, महादेव गिते आणि अक्षय आठवले या दोघांनी वाल्मिक कराड आणि सुदर्शन घुलेला मारहाण केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महादेव गिते आणि अक्षय आठवले यांना वाल्मिक कराड याने खोट्या गुन्ह्यात अडकवल्याचे सांगितले जाते. त्याचा राग या दोघांच्या मनात असल्याने त्यांनी वाल्मिक कराडला मारहाण केली असावी, अशी शक्यता भाजप आमदार सुरेश धस यांनी बोलून दाखवली. वाल्मिक कराड याने अनेकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याचे प्रकार केले आहेत. त्यामुळे हा प्रकार घडल्याची शक्यता धस यांनी व्यक्त केली.

महादेव उद्धव गित्ते (३४) सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी आणि सरपंच बापू आंधळे यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयीन कोठडीत बीड जिल्हा कारागृहामध्ये आहे. परळी शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम ३०७, ३२३, ३२६, ४२७, १४३, १४७, १४८, १४९, ५०४, ५०६, अंतर्गत गुन्हा दखाल करण्यात आला आहे. महादेव गिते हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते बबन गिते याचा कार्यकर्ता आहे. खून झालेला बापू आंधळे हा राष्ट्रवादी अजित पवार गटाचा धनंजय मुंडे यांचा कार्यकर्ता होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon