दारुड्या पतीच्या त्रासामुळे पत्नी माहेरी, नंतर आईनेच सुपारी देऊन मुलाचा काटा काढला
योगेश पांडे / वार्ताहर
छत्रपती संभाजीनगर – पती दारू पिऊन सतत त्रास देत असल्याने पत्नी मुलांना घेऊन माहेरी आली. दारू पिऊन आलेला मुलगा आईकडे चुकीची मागणी करू लागला. यामुळे त्रस्त आईने दारुड्या मुलाची २० हजारांची सुपारी देऊन काटा काढला. ही धक्कादायक घटना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील नारळा येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी आईसह २ आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अमोल याचा अठरा वर्षांपूर्वी छत्रपती संभाजी नगर येथील महिलेशी विवाह झाला होता. त्याला एक सोळा वर्षाची मुलगी आणि एक नऊ वर्षाचा मुलगा आहे. अमोलच्या वडिलांचं निधन झालं असून त्याची आई आणि तो वेगवेगळे राहत होते.अमोलला दारूचं व्यसन होतं. तो दारू पिऊन सतत त्रास देत असल्याने त्याची पत्नी, मुलगा आणि मुलगी हे तिघे सात महिन्यांपूर्वी छत्रपती संभाजीनगर येथे तिच्या माहेरी निघून गेली होती. अमोल हा दारूच्या प्रचंड आहारी गेला होता. दारू पिऊन तो आईला त्रास देत चुकीच्या मागण्या करत होता. ही बाब चंद्रकला यांनी शेजारच्या महिलेला सांगितली. असा मुलगा असेल तर त्याला मारून टाका, असं त्या महिलेने सांगितले. यावरून चंद्रकांत हजारे यांनी किरण याला वीस हजार रुपयांत अमोल याची सुपारी दिल्याची कबुली दिली आहे.
अमोल लक्ष्मण हजारे (३५) असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. तर चंद्रकला लक्ष्मण हजारे (६०), किरण रोहिदास गायकवाड (२५) विजय कचरू जाधव (३४) आणि मंदाबाई बापूराव जानकर ( ४५) अशी आरोपींची नावं आहेत.पैसे घेऊन किरण गायकवाड याने विजय जाधव याला सोबत घेतलं. अमोलचा पाठलाग करून त्याला दारू पिण्याच्या बहाण्याने संत एकनाथ उद्यानात घेऊन गेले. या ठिकाणी त्याचा दोरीने गळा आवळून खून केला. ओळख पटू नये म्हणून त्याच्या तोंडात चिखल टाकला. त्यानंतर मृतदेह नाल्यात फेकून देण्यात आला. पोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासामध्ये ही बाब उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.