मुंबईहून पुण्याला जात असणाऱ्या ई-शिवनेरीत मोबाईलवर मॅच पाहणाऱ्या बस चालकाचा व्हिडीओ समोर; परिवहन मंत्र्यांनी घेतली घटनेची गंभीर दखल
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या निर्देशानुसार बस चालवत मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणाऱ्या खाजगी चालकाला एसटी प्रशासनाने बडतर्फ केले आहे. संबंधित खाजगी कंपनीला ५ हजार रुपये इतका दंड ठोठावला आहे. २२ मार्चला सायंकाळी ७ वाजता दादर येथून पुण्याच्या स्वारगेटसाठी निघालेल्या खाजगी ई-शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळा जवळ बस चालवत क्रिकेट मॅच पाहत असलेले चित्रीकरण संबंधित बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पाठवले. याबाबत मंत्री सरनाईक यांनी तातडीने एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. परिवहन मंत्र्यांच्या निर्देशांनुसार, एसटीच्या स्थानिक अधिकाऱ्यांनी संबंधित खाजगी संस्थेच्या चालकास प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त वाहनं चालवल्या प्रकरणी बडतर्फ केले आहे. संबंधित खाजगी संस्थेला ५ हजार रुपये इतका दंड ठोठावला आहे. या कारवाईवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ई-शिवनेरी ही एसटीची मुंबई -पुणे मार्गावर धावणारी प्रतिष्ठित बस सेवा आहे. या बसमधून अनेक सन्माननीय व्यक्ती प्रवास करीत असतात. ‘अपघातविरहित सेवा’ हा या बस सेवेचा नावलौकिक आहे. त्यामुळे अशाप्रकारे बेशिस्त वाहन चालवून प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या चालकांच्यावर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रवाशांचा एसटीच्या या प्रतिष्ठित सेवेबद्दल विश्वास दृढ होत जाईल! तसेच भविष्यात एसटीकडे असलेल्या खाजगी बसच्या चालकांना संबंधित संस्थेकडून वेळोवेळी शिस्तबद्ध वाहन चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाण्याची गरज आहे”, अशी प्रतिक्रिया प्रताप सरनाईक यांनी दिली. दरम्यान, दररोज लाखो प्रवासी हे बसने प्रवास करतात. एसटी हे ग्रामीण महाराष्ट्र आणि शहरी महाराष्ट्र यांच्यातील दुवा मानली जाते. पण अशाप्रकारचे व्हिडीओ समोर आल्याने प्रवाशांच्या मनात देखील एसटीबद्दलची विश्वासार्हता कुठेतरी डगमगते. प्रवाशांच्या मनात एसटीबद्दल असणाऱ्या विश्वाला तडा बसतो. त्यामुळे अशा बेजबाबदार चालकांवर कारवाई होणं अपेक्षित आहे.