अजित पवारांच्या बारामतीतील नगरपरिषदेचा अधिकारीच भ्रष्ट; दोन लाखांची लाच घेताना रंगेहात अटक
योगेश पांडे / वार्ताहर
बारामती – राज्याला भ्रष्टाचारमुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कायम सांगत असतात. मात्र लाचखोरी ही दिवसेंदिवस अधिक पसरत असल्याचं दिसून येत आहे. यापूर्वीही अधिकाऱ्यांकडून लाच घेत असतानाच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अगदी काही हजारांपासून ते लाखांपर्यंत लाच घेणाऱ्यांना रंगेहात पकडलं आहे. दरम्यान बारामतीतूनही असाच एक प्रकार समोर आला आहे. बारामतीतील नगर परिषदेचा नगर रचनाकार विकास ढेकळे याला लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. बारामतीतील एका बांधकाम व्यावसायिकाने विकास ढेकळे यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार असलेल्या बांधकाम व्यावसायिकाला विकास ढेकळे याने पावणे दोन लाखांची लाच मागितली होती. यातील एक लाख रुपये लाच देताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ढेकळे याला रंगेहात पकडलं आहे. या संदर्भातील पुढील कारवाई सुरू आहे. लाच घेण्यात फक्त ढेकळे यांचाच सहभाग होता की, ढेकळे अन्य कुणाला यातील वाटा देत होते याचा देखील शोध घ्यायला हवा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
प्रशासनावरती उत्तम पकड असणारा नेता म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे अवघा महाराष्ट्र पाहतो. मात्र त्यांच्याच बारामती शहरातील नगर परिषदेचा कर्मचारी एवढं मोठं धाडस करतो आणि बांधकाम व्यावसायिकांना लाखो रुपयांची लाच मागतो हे पाहून मात्र आता आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.