नागपूर हिंसाचाराच्या मास्टरमाईंडला अटक; जमावाला भडकवल्याचा आरोप
योगेश पांडे / वार्ताहर
नागपूर – नागपूर हिंसाचारामागे फहीम खान मास्टरमाईंड असल्याची माहिती समोर आली आहे. फहीम खानचं जमावाला भडकवलंय अशी तक्रार देखील पोलिसात करण्यात आली होती. दरम्यान यानंतर पोलिसांनी फहीम खानला अटक केली असून त्याला २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. नागपूरच्या हिंसाचारात पोलीस, तसंच अनेक कुटुंबाना लक्ष्य करण्यात आलं होते. दरम्यान या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत ४६ जणांना अटक केली. तसंच या हिंसाचारामागच्या सूत्रधारांना सोडण्यात येणार नसल्याचा इशारा प्रवीण दरेकरांनी दिला.एवढंच नव्हे नागपूरचा हिंसाचार घडवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना बदनाम करण्याचं षडयंत्र रचल्याचा आरोपही प्रवीण दरेकरांनी केला आहे. तर नागपूरची घटना ही पूर्वनियोजित नव्हती असं पोलिसांनी सांगितल्याचा दावा जितेंद्र आव्हाडांनी केला आहे.
नागपूरच्या घटनेवरुन राज्यात चांगलंच राजकीय वातावरण तापलंय.. मात्र, दुसरीकडे हिंसाचारानंतर नागपुरात शांतता पाहायला मिळतेय. तसंच या सर्व घटनेची सखोल चौकशी सुरु असून आरोपींवर कठोर कारवाईचा इशारा पोलिसांनी दिलाआहे. दरम्यान, नागपूर हिंसाचारामागे मास्टरमाइंड असल्याशिवाय अशी घटना होऊ शकत नाही, असा आरोप विश्व हिंदू परिषदेनं केला होता. यात कोणीतरी मास्टरमाइंड आहे. त्याचा शोध पोलिसांनी घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदने केली. सर्व दोषींवर राष्ट्रीय सुरक्षा कायदा लावण्याची मागणीही त्यांनी केली. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही मागणी करण्यात आली.