मनसेच्या बैठकीत पदाधिकारी आणि जिल्हा सचिव यांच्यात तुंबळ हाणामारी; डोकी फोडली, नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
नेरळ – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुकानिहाय कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या आदेशाने लावण्यात आली होती. जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या अनुपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षाचे जेष्ठ कार्यकर्ते, पदाधिकारी व पक्षाचे जिल्हा सचिव यांच्यात प्रथम शाब्दिक आणि नंतर तुंबळ हाणामारी झाली. त्यात विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष सतीश कालेकर यांच्या डोक्याला गंभीर जखम होऊन रक्त वाहत होते. याप्रकरणी नेरळ पोलीस ठाण्यात जिल्हा सचिव अक्षय महाले आणि पारस खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ९ मार्च रोजी झालेल्या पिंपरी येथील पक्षाच्या वर्धापनदिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्ष संघटना व शिस्तीबाबत धडे दिले होते. राज ठाकरे यांनी केलेल्या सूचनेनुसार कर्जत तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आगामी काळातील पक्षाची शिस्तबध्द संघटनात्मक बांधणी तसेच रिक्त जागेच्या नियुक्ती बाबत निर्णय आपापल्या विभागा नुसार पक्षाचे उपक्रम, संघटनात्मक उपक्रमात जनतेचा सहभाग याबाबत मनसे जिल्हाध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी नेरळ येथे आयोजित करण्यात आली होती. जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या आई आजारी असल्याने त्यांना घेऊन नवी मुंबईत रुग्णालयात जावं लागल्याने जिल्हा अध्यक्ष जितेंद्र पाटील यांच्या अनुपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीला तालुका अध्यक्ष यशवन्त भवारे यांच्यासह पक्षाचे तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
सदर बैठकीत पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असलेले पदाधिकारी सतीश कालेकर यांनी विधानसभा निवडणुकीतील रणनीती आणि नंतरची वाटचाल याविषयी चर्चा सुरु केली. त्यात पक्षावधींची सुरु असलेली चर्चा वादळी रूप धारण करीत असताना मनसेचे जिल्हा सचिव अक्षय महाले व सतीश कालेकर यांच्यामध्ये पक्षाच्या बॅनरच्या फोटो वरून आपापसात शाब्दिक चर्चा होऊ लागली. त्यानंतर या चर्चेचा राग आल्याने मनसेचे जिल्हा सचिव अक्षय महाले आणि त्यांच्या सोबत उपस्थित असलेले तेजस खैरे यांच्याकडून सतीश कालेकर यांना हाणामारी करण्यात आली. त्यावेळी बैठकीसाठी लावण्यात आलेल्या खुर्च्या फेकून मारण्यात आल्या, त्यात सतीश कालेकर यांच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि शेवटी हे भांडण नेरळ पोलीस ठाण्यात पोहचले. नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार केल्यानंतर सतीश कालेकर यांना झालेली मारहाण याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.पक्षाची बाजू चव्हाट्यावर येऊ नये म्हणून हे प्रकरण मिटवण्याचा देखील प्रयत्न मनसेच्या वरिष्ठ पातळीवरून सुरु होता, मात्र कधीही अधक्षांच्या बैठकीत न आलेल्या पारस खैरे याला आपल्यासोबत भांडण करण्यास आणण्यात आले होते आणि हे सर्व जाणीवपूर्वक ठरवून केले असल्याचा आरोप सतीश कालेकर यांचा होता. नेरळ पोलीस ठाण्यात सतीश वाळकु कालेकर राहणार बिरडोळे यांच्या कडून दाखल करण्यात आलेल्या फिर्यादी नुसार त्यांना झालेल्या मारहाण प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम ११८ (१), ११५ (२), ३५२, ३५१ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अक्षय नानाभाऊ महाले आणि पारस खैरे दोघे रहाणार डायमंड सोसायटी डिकसळ गारपोली यांच्यावर हा गुन्हा दाखल आहे. प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी धावले यांच्या मार्तंग्दर्शनाखाली पोलीस हवालदार लावरे अधिक तपास करीत आहे.