स्कोडा कारमधून विदेशी दारूची तस्करी करणारा चालक गजाआड, अँटॉप हिल पोलिसांची कारवाई
मुंबई – अँटॉप हिल पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत अवैधरीत्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या इसमाला अटक केली आहे. ११ मार्च रोजी संध्याकाळी ७ वाजता अँटॉप हिल पोलिसांचे गुन्हे प्रकटीकरण पथक पंजाबी कॅम्प परिसरात गस्त घालीत असताना, एका कारमधून विदेशी दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ सेवा समिती को. ऑप. हौसिंग सोसायटी गेटसमोर सापळा रचला. काही वेळातच स्कोडा फॅबिया ( एमएच -०१ : बीबी ००८०) ही कार संशयास्पदरीत्या त्या मार्गावर दिसली. गाडीला थांबवून तपासणी केली असता, अभिषेक रमेश भोईर (वय २७, व्यवसाय – वाहन चालक, रा. गणेश नगर, अँटॉप हिल, मुंबई) हा विना परवाना मोठ्या प्रमाणावर विदेशी दारू वाहतूक करताना आढळला. पोलिसांनी पंचनामा करून गाडीतील संपूर्ण मुद्देमाल जप्त केला व आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ च्या कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा नोंदवला.
विदेशी दारू व बिअर तसेच स्कोडा फॅबिया कार असा एकूण १,२१,३८०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्याचा तपास स.पो.नि. शिवाजी मदने, स.पो.नि. निगुडकर, पो.ह.क्र. घुगे, आंधळे, टेळे, किरतकर, सजगणे व आमदे यांनी केला तर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाकर ढाणे, अँटॉप हिल पोलीस ठाणे, मुंबई यांचे मार्गदर्शन लाभले.