पुण्यात नशा येण्यासाठी औषधांचा वापर; दोन तरुणांना केले जेरबंद

Spread the love

पुण्यात नशा येण्यासाठी औषधांचा वापर; दोन तरुणांना केले जेरबंद

पोलीस महानगर नेटवर्क

पुणे – पुणे तिथे काय उणे अशी म्हण प्रचलित होती, मात्र आता पुणे तिथे गुन्हे अशी स्थिती निर्माण झाली आहे. पुण्यात नशेसाठी औषधांचा वापर करण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. अमली पदार्थांचे सेवन परवडत नसल्याने अनेक तरुण नशेसाठी औषधांचा वापर करत असल्याचे दिसून आले आहे. हडपसर पोलिसांनी तरुणांना नशा येणारी औषधांची विक्री केल्याप्रकरणी दोन तरुणांना जेरबंद केलं आहे. योगेश सुरेश राऊत (वय २५, रा. मांजरी, हडपसर), निसार चाँद शेख (वय २३, रा. हडपसर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई महेश चव्हाण यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राऊत आणि शेख यांनी औषध निर्मिती अभ्यासक्रमाची पदवी नाही, तसेच त्यांच्याकडे अन्न आणि औषध विभागाकडून (एफडीए) दिला जाणारा परवाना नाही. राऊत आणि शेख यांच्याकडे बेकायदा औषधांचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. नशेसाठी या औषधांचा वापर होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हडपसर भागातील जिजामाता वसाहत परिसरात सापळा लावून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून औषधांच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. अशा प्रकारच्या औषधांचे सेवन केल्यास आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होऊ शकतो, तसेच मृत्यू होऊ शकतो, असे पोलीस शिपाई चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले, गुन्हे शाखेचे निरीक्षक निलेश जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.

नशेचा विळख्यात पुणे

महाविद्यालयीन तरुण-तरुणींना नशेसाठी औषधांची विक्री केली जात असल्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले होते. अनेक तरुण नशेच्या विळख्यात सापडले आहेत. डाॅक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशा प्रकारच्या औषधांची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. असे असले तरी महाविद्यालयीन तरुण – तरुणी नशेच्या विळख्यात सापडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon