गुटखा उद्योगावर पोलिसांचा छापा, कोट्यवधींचा साठा जप्त; ४ जणांना घेतले ताब्यात
योगेश पांडे / वार्ताहर
शिरवळ – स्थानिक पोलिसांनी शहरातील उच्चभ्रू सोसायटीतील एका गोडाऊनवर मोठी कारवाई करत अवैध गुटखा आणि पानमसाला साठ्याचा पर्दाफाश केला आहे. या ठिकाणी गुटखा उत्पादनासाठी अत्याधुनिक यंत्रसामग्री वापरली जात होती. या कारवाईमुळे परिसरात खळबळ माजली असून, नागरिकांमध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे. शिरवळ पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनंतर हा छापा टाकण्यात आला. गोडाऊनची तपासणी करताना १ कोटी ६ लाख १९ हजार २७० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यामध्ये गुटखा उत्पादनासाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री आणि एक चारचाकी वाहन देखील जप्त करण्यात आले. पोलिसांनी या कारवाईदरम्यान चार व्यक्तींना ताब्यात घेतले आहे.
या मोठ्या कारवाईसाठी तब्बल १२ ते १५ तास लागले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. गुटखा निर्मिती आणि साठवणूक किती दिवसांपासून सुरू होती, याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. मात्र, या अवैध धंद्याचा मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला आहे. महाराष्ट्रात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही तो मोठ्या प्रमाणावर विक्रीसाठी येत असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.