स्वारगेट प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे अखेर मध्यरात्री जेरबंद; गेले दोन दिवस उसाच्या शेतात होता लपून
योगेश पांडे / वार्ताहर
पुणे – पुण्यातील स्वारगेट बसस्थानकामध्ये एका २६ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा पोलिसांनी शोध सुरू केला होता, तो सापडत नव्हता. पोलिसांनी त्याला शोधून देणाऱ्यास १ लाखाचे बक्षिसही जाहीर केले होते. दरम्यान, आता त्याला त्याच्या गावातूनच ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याच्या शोधासाठी कालपासून पोलिसांनी त्याच्या गावात सर्च ऑपरेशन सुरू केले होते. अखेर मध्यरात्री त्याला पोलिसांनी अटक केली आहे. तो ऊसाच्या शेतात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी शेतात त्याचे कपडे सापडले, यानंतर तो याच शिवारात असल्याचा पोलिसांना संशय आला. गुरुवारी पोलिसांनी दिवसभर आरोपी दत्तात्रय गाडे याचा युद्धपातळीवर शोध सुरू केला होता. स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर तो आपल्या गुणाट या गावी गेला असल्याचे समोर आले होते. गावकऱ्यांनीही पोलिसांना मदत केली. दिवसभर शोधमोहिम करुन आरोपी पोलिसांना सापडला नव्हता. रात्र झाल्यानंतर पोलिसांनी शोधमोहिम बंद केली नाही, रात्रीही त्याला शोधण्यासाठी प्रयत्न सुरू केले. शेतात त्याचे कपडे सापडल्यामुळे तो याच शिवारात असल्याचा पोलिसांना संशय आला. यानंतर पोलिसांना आणखी शोध वाढवला. परिसरात ऊसाची शेती असल्यामुळे पोलिसांना आरोपीला शोधण्यास अडचणी यायला लागल्या. पोलिसांना आरोपीचे कपडे ज्या ठिकाणी सापडले त्याच ठिकाणी त्याचा शोध सुरू ठेवला.
तो दोन दिवसापासून याच शिवारात असल्याचा गावकऱ्यांना संशय आला होता. काही लोकांनी त्याला पाहिले होते. यामुळे पोलिसांना त्याच गावात आरोपी दत्तात्राय गाडे याचा शोध घेतला. दिवसभर शोधमोहिम सुरु ठेऊनही तो सापडला नाही, अखेर रात्री तो एका ओळखीच्या घरात पिण्याचे पाणी मागण्यासाठी गेल्याची माहिती मिळाली. यावेळी आरोपीने एक लिटर पाण्याची बाटली भरुन त्याने पुन्हा एकदा शेतात पळ काढला. पोलिसांनी त्या घराच्या आजूबाजूच्या शेतात त्याचा शोध घेतला, यानंतर पोलिसांना त्याचे कपडे सापडले. अखेर मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास तो एका शेतात पोलिसांना सापडला.