विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बारा तासांच्या आत केली अटक
योगेश पांडे / वार्ताहर
कल्याण – कल्याण मध्ये विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आला. महिलेने लग्नासाठी आरोपीकडे तगादा लावला असता त्याने लग्नास नकार दिला. त्यानंतर पीडित महिलेने पोलिसात धाव घेतली. विधवा महिलेस लग्नाचे आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीस पोलिसांनी बारा तासांच्या आत अटक केली आहे. रामनारायण गुप्ता असे या आरोपीचे नाव असून तो अनेक वर्षांपासून महिलेवर अत्याचार करतो. रामनारायण गुप्ता आणि पीडित महिला हे जीन्स पॅन्ट खिसे पॅकिंग व्यवसायात भागीदार होते. गेल्या सहा वर्षांपासून आरोपी महिलेवर अत्याचार करत असल्याची माहिती समोर आली आहे. पीडित महिलेच्या पतीचे निधन झाल्यानंतर राम गुप्ताने तिच्याशी जवळीक वाढवली. अगोदर त्याने महिलेला गोड बोलून तिचा विश्वास संपादन केला आणि लग्नाचे आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले.
यानंतर महिलेने जेव्हा लग्नाचा आग्रह धरला, तेव्हा आरोपीने सुरूवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. हेच नाही तर त्याने महिलेला धमक्या देखील दिल्या. पुढे महिला लग्नासाठी आग्रह करत असल्याने त्याने तिला मारहाण करण्यास सुरूवात केली आणि तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला. शेवटी महिलेने पोलिसात धाव घेतली. अखेर महिलेने कोळसेवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. कोळसेवाडी पोलिसांनी राम गुप्ता विरोधात गुन्हा दाखल करून अवघ्या १२ तासामध्ये त्याला अटक केली. या घटनेने कल्याण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस या प्रकरणात अधिकचा तपास करत आहेत. .