तुरुंगातून कॉइन बॉक्स हद्दपार; कैद्यांना अँलन फोनद्वारे कुटुंबाशी संवाद साधता येणार, आठवड्यातून तीन वेळा दहा मिनिटे बोलण्याची सुविधा

Spread the love

तुरुंगातून कॉइन बॉक्स हद्दपार; कैद्यांना अँलन फोनद्वारे कुटुंबाशी संवाद साधता येणार, आठवड्यातून तीन वेळा दहा मिनिटे बोलण्याची सुविधा

पोलीस महानगर नेटवर्क

रायगड – या अगोदर तुरुंगातील कैद्यांना त्यांच्या कुटुंबियांना खूप त्रास सहन करावा लागत असे, परंतु कालांतराने बदल होत जाऊन त्यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. आता तर तुरुंगातील कैद्यांना आठवड्यातून तीन वेळा आपल्या कुटूंबाशी संवाद साधता येणार आहे. यासाठी तुरूंगात स्मार्ट कार्ड वर चालणाऱ्या अँलन फोनची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अलिबाग येथील जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात नुकताच या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. कॉईन बॉक्स सुविधा हद्दपार झाल्यानंतर आता अ‍ॅलन फोन सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे सुरवातीला प्रायोगिक तत्वावर ही सुविधा पुण्यातील येरवडा तुरुंगात राबविण्यात आली होती. त्यास चांगला प्रतिसाद लाभल्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक आणि महानिरिक्षक तुरुंग प्रशासन यांनी राज्यभरात ही सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. स्मार्ट कार्डच्या माध्यमातून हा फोन कैद्यांना वापरता येणार आहे.

पूर्वी कॉईन बॉक्स सुविधा तुरूंगात उपलब्ध असायची. नंतर या कॉईन बॉक्समध्ये वारंवार बिघाड होऊ लागले. कॉईन बॉक्स फोनची दुरुस्ती कठीण होत गेली. नवीन कॉईन बॉक्स फोनही उपलब्ध होत नव्हते. त्यामुळे स्मार्ट कार्ड वर फोन चालणाऱ्या अ‍ॅलन फोनचा पर्याय कैद्यांना उपलब्ध करून देण्यात आला आहे. तामिळनाडू येथील कंपनीने या फोनची निर्मिती केली आहे, कैद्यांना आठवड्यातून तीन वेळा आपल्या कुटूंबियांशी दहा मिनटे बोलता येणार आहे. यामुळे कैद्यांचा मानसिक ताण कमी होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

गुरुवारी महेश पोरे यांच्या उपस्थितीत अलिबाग मध्यवर्ती कारागृहात या सुविधेचा शुभारंभ करण्यात आला. बंदीवानांना स्मार्ट कार्डांचे वाटप करण्यात आले. यावेळी कारागृह अधीक्षक अशोक कारकर, वरिष्ठ तुरुंग अधिकारी रामचंद्र रणनवरे, निरीक्षक शशिकांत निकम उपस्थित होते. या सुविधेची तांत्रिक बाजू कर्मचारी योगेश राठोड आणि अनिकेत कातमाने हे सांभाळणार आहेत. अलिबाग येथील कारागृहात सध्या साधारणपणे २०० कैदी आहेत. या सर्वांना या सुविधेचा लाभ होणार आहे. जिल्हा मध्यवर्ती कारागृहात गेल्या काही वर्षात कैद्यांना चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. कैद्यांना पूर्वी हाताने कपडे धुवावे लागत होते. आता कपडे धुण्यासाठी उच्च क्षमतेच्या मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या शिवाय कारागृहाच्या पाकगृहात पोळ्या बनविण्यासाठी मशिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. शुध्द पाण्याचा पुरवठा व्हावा यासाठी आर ओ जलशुद्धीकरण यंत्र बसविण्यात आले आहे. शिजलेले अन्न ठेवण्यासाठी हॉट पॉट सुविधाही देण्यात आली आहे. त्यामुळे तुरुंगातील कैद्यांना आता त्यांच्या कुटूंबियांना आठवड्यातून तीन वेळा भेटता येणार असल्याने कैद्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon