मुलुंड हादरले ! घटस्फोटासाठी सासूला जबाबदार धरत जावयाने सासूला पेटवल्या नंतर स्वतःही केली आत्महत्या
योगेश पांडे / वार्ताहर
मुंबई – मुंबईतील अत्यंत गजबलेलं ठिकाण असलेल्या मुलुंडमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. आपला संसार मोडण्यात सासूच कारणीभूत असल्याचा राग मनात ठेवून जावयाने सासूला पेटवून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आधी सासूला पेटवून दिले, त्यानंतर त्यानेही आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अदिक तपास सुरू आहे. मात्र, या घटनेने मुलुंडच नव्हे तर अख्खी मुंबई हादरून गेली आहे. बाबी दाजी उसरे (७२) असं या मयत सासूचं नाव आहे. तर कृष्णा अटनकर (५९) असं जावयाचं नाव आहे. कृष्णा हा ड्रायव्हर होता. तो टेम्पो चालवायचा. कृष्णाचा संसार मोडला होता. आपल्या सासूनेच आपला संसार मोडल्याचा त्याच्या मनात राग होता. त्यामुळे त्याने सासूला पेटवून देत स्वत:लाहा पेटवून घेऊन आत्महत्या केली. दोन दिवसापूर्वी पहाटे मुलुंडच्या नवघर परिसरात ही घटना घडली आहे.
कृष्णा आणि त्याच्या पत्नीचे सतत भांडणं होत होती. त्यामुळे रोजच्या कटकटीला वैतागून कृष्णा अटनकरची पत्नी त्याला सोडून गेली होती. त्यांचा दहा वर्षापूर्वी घटस्फोट झाल्याचीही माहिती आहे. आपली पत्नी सोडून जाण्याला सासू बाबी ही कारणीभूत असल्याने त्याच्या मनात सासूविरोधात राग होता. त्यामुळे त्याने सासू बाबीला मुलुंडच्या मिठागर रोड येथील नाणेपाडा येथे भेटायला बोलावलं. त्यावेळी त्यांच्या वाद सुरू झाले. रस्त्यावर वाद नको म्हणून कृष्णाने सासूला टेम्पोत नेले. त्यानंतर काही समजण्याच्या आतच त्याने बाबीवर लोखंडी हातोडीने वार करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाबी रक्तबंबाळ झाली. बाबी वेदनेने तडपत असतानाच कृष्णाने गाडीतील थिनर आणि पेट्रोल बाबीच्या अंगावर ओतून तिला पेटवून दिलं. त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर कृष्णाने हे पेट्रोल आणि थिनर स्वत:च्या अंगावर ओतून आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच मुलुंडच्या नवघर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी सुरुवातीला आकस्मिक मृत्यूची नोंदही केली. पण अधिक तपास केल्यानंतर ही हत्याच असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं आणि पोलिसांनी अधिक कलमं वाढवली.