बनावट कागदपत्रांच्या आधारे कार कर्ज घेऊन आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
७ आरोपी अटकेत, १६ आलिशान गाड्या जप्त, एकूण मुद्देमाल.७.३० कोटी

मुंबई – मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ ने मोठ्या आर्थिक फसवणुकीचा छडा लावून एका टोळीला अटक केली आहे. ही टोळी बोगस कागदपत्रांच्या आधारे विविध बँकांकडून कार कर्ज घेत होती आणि त्या गाड्या इतर राज्यांत विकत होती किंवा गहाण ठेवून पैसे उभे करत होती. आरोपींनी आधार कार्ड, पॅन कार्ड, आरसी बुक, एमएमआरडीए अलॉटमेंट पत्र, बँक स्टेटमेंट आणि आयटी रिटर्न यांसारखी बनावट कागदपत्रे तयार करून बँकांकडून कार कर्ज घेतले. ही महागडी वाहने नंतर बनावट आरसी बुकच्या आधारे इतर राज्यांमध्ये विकली जात होती. तसेच, चोरीच्या गाड्यांना नव्या चेसिस आणि इंजिन नंबरसह पुन्हा विक्रीसाठी तयार केले जात होते. सुरुवातीला महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स कंपनीच्या नावाने रु.
१६ लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला होता. तपासादरम्यान, पोलिसांना मोठ्या आंतरराज्यीय टोळीचा शोध लागला. मुंबई, ठाणे, इंदूर (मध्यप्रदेश) आणि अहमदाबाद (गुजरात) येथे छापे मारल्यानंतर सात आरोपींना अटक करण्यात आली.
या कारवाईत बीएमडब्ल्यू, किया ईव्ही, हुंडई अल्काझार, महिंद्रा थार, टोयोटा फॉर्च्युनर आणि टोयोटा लेजेंडर अशा एकूण १६ आलिशान गाड्या पोलिसांनी जप्त केल्या. त्यांची एकूण किंमत सुमारे रु. ७.३० कोटी आहे. या प्रकरणात अजून आरोपींचा शोध घेतला जात आहे. ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी तातडीने मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट ३ शी संपर्क साधावा. सदर यशस्वी कारवाई मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती, संयुक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) लक्ष्मी गौतम, अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शशिकुमार मीना, उपपोलीस आयुक्त (डिटेक्शन) दत्ता नलवडे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (मध्यवर्ती) सुनील चंद्रमोर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सदानंद येरकर, पोलीस निरीक्षक शामराव पाटील, शरद धराडे, एपीआय समीर मुजावर, एपीआय अमोल माळी, पीआय इंद्रजित सिरसाट, पीआय गोरेगावकर, एएसआय कृतिबस राऊळ आणि त्यांच्या पथकांनी केली याशिवाय प्रॉपर्टी सेल, इंटेलिजन्स युनिट आणि इतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनीही या तपासात महत्त्वाची भूमिका बजावली.