चित्रपटात रोल देण्याचा आमिषाने ठाण्यातील तरुणीवर सिंगापूरमध्ये अत्याचार; कापुरबावडी पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल
योगेश पांडे / वार्ताहर
ठाणे – ठाण्यातील माजीवाडा येथील रहिवासी असणाऱ्या एका महिलेवर वारंवार लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. पीडित महिलेला चित्रपटात चांगला रोल देतो, असं आमिष दाखवून तिला सिंगापूरला घेऊन जात तिच्यावर अत्याचार करण्यात आला आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी पीडितेचे अश्लील व्हिडीओ शूट करून तिला ब्लॅकमेल केलं आहे. मागच्या तीन वर्षांपासून हा धक्कादायक प्रकार सुरू होता. या प्रकरणी अखेर पीडित महिलेनं कापुरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा तपास पोलीस करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ३४ वर्षीय पीडित महिला ठाण्याच्या माजीवाडा येथील रहिवासी आहे. तीन वर्षांपूर्वी तिची ओळख एका आरोपी महिलेशी झाली होती. संबंधित महिलेनं आपले चित्रपट इंडस्ट्रीत वरिष्ठ पदावरील लोकांसोबत कॉन्टॅक्ट्स असल्याचं पीडितेला सांगितलं होतं. तसेच तिने चित्रपटात चांगला रोल मिळवून देण्याचं आमिष दाखवलं. एवढंच नव्हे तर आरोपी महिला टॉपची हिरोईन बनवते, असं आमिष दाखवून पीडितेला सिंगापूरला घेऊन गेली. सिंगापूरात गेल्यानंतर आरोपी महिलेनं पीडितेची एका व्यक्तीशी ओळख करू दिली. संबंधित व्यक्ती चित्रपट इंडस्ट्रीमधील मोठी व्यक्ती असल्याचं सांगितलं. यानंतर संबंधित व्यक्ती पीडितेला आपल्या घरी घेऊन गेला. याठिकाणी त्याने पीडितेला दारु पाजली आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार एवढ्यावरच थांबला नाही, तर आरोपीनं मुंबईतील विविध हॉटेल्समध्ये वारंवार पीडितेवर लैंगिक अत्याचार केला आहे.
दरम्यान, आरोपी महिलेनं पीडितेचे आरोपी व्यक्तीसोबतचे अश्लील व्हिडीओज शूट केले. या व्हिडीओजच्या आधारे तिने पीडितेला ब्लॅकमेल केलं. हे प्रकरण एवढ्यावरच थांबलं नाही. आरोपी महिलेनं आपला पती आणि मुलीला हाताशी धरून पीडितेला अनेकदा फोनवरून धमक्या दिल्या. तसेच वाईट परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी दिली. तसेच महिलेला जातीवरून शिवीगाळ देखील केली. अखेर आरोपींच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेनं कापुरबावडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी चार जणांविरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.