माजी नगराध्यक्षांच्या मुलानेच दिली खुनाची सुपारी; साताऱ्यात राजकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ, खुनाचा हल्लेखोरांचा डाव उधळला
योगेश पांडे / वार्ताहर
सातारा – सातारा पोलिसांनी दरोडाच्या संशयातून अटक केलेल्या आरोपींकडून खुनाच्या सुपारीचा उलगडा झाला आहे. मारहाणीच्या वादातून धीरज ढाणे याच्या खुनाची सुपारी वाजवण्यासाठी साताऱ्यामध्ये आलेल्या इचलकरंजीतील जर्मनी गँगच्या मुस्क्या सातारा पोलिसांनी आवळल्या आहेत. या प्रकरणात या टोळीतील इचलकरंजी आणि साताऱ्यातील ७ जणांना अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी टोळीकडून २ पिस्टल, कोयता, जिवंत काडतुसे असा एकूण ५ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे यामधील सूत्रधार हा माजी नगरसेवक वसंत लेवे यांचा मुलगा निलेश लेवे हा आहे. निलेशनेच या टोळीला धीरज ढाणेला मारण्यासाठी २० लाखांची सुपारी दिली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार शाहूनगर परिसरामध्ये काही युवक संशयास्पदरित्या थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस पथक पोहोचताच पाचजण सापडले. यामुळे अधिक पोलिसांना पाचारण करण्यात आले. संशयित दरोडा टाकण्याच्या तयारीमध्ये होते. पोलिसांनी आणखी दोन युवकांची झडती घेतली असता त्यांच्याकडे २ देशी बनावटीची पिस्टल, जिवंत काडतुसे, ४ रिकाम्या पुंगळ्या, २ दुचाकी असा मुद्देमाल मिळाला. प्राथमिक चौकशीत त्यांनी एका सराफ पेढीवर दरोडा टाकणार असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर खुनाच्या सुपारीचा उलगडा झाला.
सातार्यातील धीरज ढाणेला जीवे मारण्याची सुपारी मिळाली असून ती सुपारी वाजवायला आलो असल्याचे इचलकरंजीमधून आलेल्या गुंडांनी सांगितले. यामुळे पोलिसांनी दाखल गुन्ह्यात कलमांची वाढ करुन सुपारी देणार्याचे नाव विचारले असता त्यांनी निलेश लेवे असे सांगितले. त्याने २० लाख रुपयांची सुपारी दिली असून त्यापैकी २ लाख रुपये अॅडव्हान्स दिल्याचेही सांगितले. विधानसभा निवडणुकीत मतदानादिवशी अनंत न्यू इंग्लिश स्कूल परिसरात नीलेश लेवे व पप्पू लेवे यांचे जोरदार भांडण झाले होते. त्यावेळी वसंत लेवे यांना धीरज ढाणे व त्याच्या मित्रांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटांवर गुन्हे दाखल केले होते. या मारहाणीचा राग निलेश याच्या डोक्यात होता. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे एक खून होता होता वाचला आहे. पोलिसांनी अटक केलेली जर्मनी टोळी कोल्हापुरात सुद्धा कुख्यात असून अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. इचलकरंजी पोलिसांनी गुरुवारी याच टोळीतील गुंडाची धिंड काढत अद्दल घडवली होती. वाढदिवसाच्या नावाखाली त्यांचा धिंगाणा सुरु होता.