लोणावळ्यात घराच्या वादातून हाणामारी; परस्पर विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल
पोलीस महानगर नेटवर्क
लोणावळा – पर्यटन व थोडं थंड हवेचं ठिकाण म्हणून पर्यटक खंडाळा व लोणावळा परिसरात येत असतात. एरव्ही गजबजलेल्या लोणावळ्यात काही अपवाद वगळता शांतता असते. तरीसुद्धा अधूनमधून गुन्हेगारी डोकं वर काढते. अशीच एक घटना खंडाळा परिसरात घडली आहे. घराच्या वादातून कुटुंबात तुंबळ हाणामारी झाली. ही घटना जुना खंडाळा येथे घडली. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात परस्पर विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. काजल सुनील कुचेकर (वय २९, रा. जुना खंडाळा, मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार किरण मास कुचेकर, अनिल भाऊ कुचेकर (दोघे रा. जुना खंडाळा, मावळ) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घराच्या वादातून फिर्यादी यांचे दीर किरण आणि अनिल हे फिर्यादी यांच्या दुकानात आले. त्यांनी लोखंडी पाईप ने फिर्यादी यांच्या पतीला मारहाण केली. फिर्यादी यांच्या मुलीला देखील मारहाण केली. शिवीगाळ, दमदाटी करून आरोपींनी फिर्यादी यांच्या दुकानाचे काउंटर, फ्रिजची तोडफोड करून नुकसान केले.
याच्या परस्पर विरोधात किरण भाऊ कुचेकर (वय ४०, रा. खंडाळा, मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुनील भाऊ कुचेकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कुचेकर याने फिर्यादी यांना पाईपने मारून जखमी केले. फिर्यादी यांच्या मुलीला देखील मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. लोणावळा शहर पोलीस तपास करीत आहेत.