ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये वाढत्या अंतरा दरम्यानच पुन्हा दोन्ही पक्षांच्या नेते एकत्रित

Spread the love

ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये वाढत्या अंतरा दरम्यानच पुन्हा दोन्ही पक्षांच्या नेते एकत्रित

अखेर उद्धव ठाकरे तयार;राज ठाकरेंच्या मनसेला २ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळणार

योगेश पांडे / वार्ताहर

मुंबई – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये पुन्हा एकदा राजकीय हालचाली वेगाने सुरू झाल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिकेतील प्रभाग समिती अध्यक्षपदांवरून दोन्ही पक्षांमध्ये महत्त्वाच्या चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मुंबई महापालिकेत निवडून आलेल्या संख्याबळानुसार ठाकरे यांच्या शिवसेनेकडे तब्बल सात प्रभाग समित्यांची अध्यक्षपदे येत आहेत. मात्र आपल्या मित्रपक्ष असलेल्या मनसेला त्यापैकी एक किंवा दोन प्रभाग समिती अध्यक्षपदे देण्याबाबत सकारात्मक चर्चा सुरू असल्याचे समजते.

मनसेकडून सुरुवातीला ठाकरेंच्या शिवसेनेकडे त्यांच्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक पद देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र ठाकरे गटाने आपल्या कोट्यातील तीनही स्वीकृत नगरसेवक आपल्या पक्षातूनच देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आहे. या पार्श्वभूमीवर आता मनसेला समाधान देण्यासाठी प्रभाग समिती अध्यक्षपदाचा पर्याय पुढे आल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

या संदर्भात मनसेचे नेते संदीप देशपांडे यांच्या उपस्थितीत मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार आणि ठाकरे गटाचे सचिव सुरज चव्हाण यांच्यात बैठक झाल्याची माहिती मिळत आहे. या बैठकीत प्रभाग समिती अध्यक्षपद वाटपाबाबत प्राथमिक चर्चा झाल्याचे समजते. अजून एक ते दोन फेऱ्यांच्या बैठका होण्याची शक्यता असून त्यानंतर अंतिम निर्णय होऊ शकतो, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंनी एकत्र येत राजकीय समीकरण बदलले होते. मात्र निवडणुकीनंतर अवघ्या काही महिन्यांत दोन्ही पक्षांमध्ये दुरावा निर्माण झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः एकनाथ शिंदे यांची राज ठाकरे यांनी घेतलेली भेट या चर्चांना कारणीभूत ठरल्याचे बोलले जात होते. या भेटीनंतर दोन्ही पक्षांतील नेत्यांकडून परस्परांवर सूचक टीकाही करण्यात आली होती. तथापि, या सर्व घडामोडींमध्ये आता पुन्हा दोन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून चर्चा करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon