ठाणे पोलिसांच्या महिला कर्मचाऱ्याला ‘महाराष्ट्र श्री’ किताबाचा सन्मान, पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्याकडून सत्कार
ठाणे – ठाणे पोलीस आयुक्तालयातील मुंब्रा पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस अंमलदार रेखा बाबुराव शिंदे यांनी ‘महाराष्ट्र श्री’ हा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे. ५ फेब्रुवारी २०२५ रोजी थेऊर, पुणे येथे ग्रेटर बॉम्बे बॉडी बिल्डिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित महिला बॉडी बिल्डिंग स्पर्धेत त्यांनी हा बहुमान मिळवला.
रेखा शिंदे यांनी यापूर्वीही अनेक राष्ट्रीय व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. महाराष्ट्र पोलीस गेम २०२३ मध्ये सुवर्णपदक व चॅम्पियनशिप जिंकण्यासोबतच, हरियाणामधील अखिल भारतीय पोलीस क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक व चषक मिळवला होता. त्यानंतर २०२४ मध्ये लखनऊ येथे झालेल्या अखिल भारतीय पोलीस गेम रेसलिंग क्लस्टरमध्ये रौप्यपदक, तर महाराष्ट्र पोलीस गेम २०२४ (नाशिक) मध्ये सुवर्णपदक पटकावले.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी त्यांचा विशेष सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.