बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या अडचणी वाढल्या, कोर्टाकडून थेट अटक वॉरंट जारी

Spread the love

बॉलिवूड अभिनेता सोनू सूदच्या अडचणी वाढल्या, कोर्टाकडून थेट अटक वॉरंट जारी

योगेश पांडे/वार्ताहर 

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सोनू सूद कायदेशीर कचाट्यात सापडला आहे. एका फसवणुकीच्या प्रकरणात कोर्टानं सोनू सूद विरोधात अटकेचं वॉरंट जारी केलं आहे. पंजाबमधील लुधियाना कोर्टानं हा अटक वॉरंट जारी केला आहे. अंधेरी पश्चिम पोलिसांनी सोनूला अटक करून त्याला न्यायालयात हजर करावं, असा आदेश कोर्टाकडून देण्यात आला आहे. या सगळ्या प्रकरणानंतर आता सोनू सूदच्या अडचणी वाढताना दिसत आहेत. पंजाबच्या लुधियाना न्यायिक दंडाधिकारी रमणप्रीत कौर यांनी हे वॉरंट जारी केले आहे. लुधियाना येथील वकील राजेश खन्ना यांनी मोहित शुक्ला नावाच्या एका व्यक्तीविरोधात दहा लाख रुपयांच्या कथित फसवणुकीचा खटला दाखल केला आहे. ज्यामध्ये त्यांनी दावा केला आहे की, त्यांना बनावट रिजिका कॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. यात पैसे गुंतवले तर चांगला आर्थिक फायदा होईल, असं आमिष आरोपींकडून देण्यात आलं होतं. ज्या कॉइनमध्ये गुंतवणूक करण्याचं आमिष दाखवलं होतं, त्या कॉईनचे ब्रँड एम्बेसेडर सोनू सूद असल्याचा आरोप आहे.

आता या प्रकरणाशी थेट सोनू सूदचा संबंध नाहीये. पण या फसवणूक प्रकरणात साक्ष देण्यासाठी कोर्टाकडून सातत्याने सोनू सूदला बोलवण्यात येत होतं. मात्र सोनू कोर्टात हजर झाला नाही. यामुळेच त्याच्याविरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आले. लुधियाना न्यायालयाने आपल्या आदेशात, मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील ओशिवरा पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांना सोनू सूदला अटक करण्याचे निर्देश दिले. आदेशात म्हटले आहे की, सोनू सूदला समन्स बजावून देखील तो उपस्थित राहण्यास अपयशी ठरला आहे. त्यामुळे सोनू सूदला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. या सगळ्यावर सोनू सूदने प्रतिक्रिया दिली आहे. माझा या फसवणुकीच्या प्रकरणाशी कसलाही संबंध नाहीये. मी अशा कोणत्याही कॉईनचा ब्रँड अम्बेसेडर नाहीये. यापूर्वी माझ्या वकिलांकडून याबाबत कोर्टात प्रतिसाद देण्यात आला आहे. १० तारखेला यावर पुन्हा मी माझी बाजू कोर्टात मांडणार असल्याचं सोनू सूदकडून सांगण्यात आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Right Menu Icon