सायबर गुन्ह्यातील टोळी गजाआड, डोंगरी पोलिसांची मोठी कारवाई
मुंबई – डोंगरी पोलिसांनी सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात मोठी कारवाई करत एकूण ११ आरोपींना अटक केली आहे. हे आरोपी बनावट शेअर मार्केट अँपद्वारे गुंतवणूकदारांची फसवणूक करत होते. तक्रारदार रविराज कांबळी (६०) यांना “एसएमसी” नावाच्या बनावट अँपद्वारे शेअर बाजारात नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्यांनी विश्वास ठेवून वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये ८.५६ लाख रुपये ट्रान्सफर केले. मात्र, काही दिवसांनी त्यांना फसवणुकीची जाणीव झाली आणि त्यांनी डोंगरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासादरम्यान गौतम गोपाल दास (४८) आणि श्रीनिवास राजू राव (३६) यांना डिसेंबर २०२४ मध्ये अटक करण्यात आली. पुढील तपासात बँक ऑफ महाराष्ट्र खात्याचा वापर झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर ओंकार युवराज थोरात (२७) आणि श्रीकांत बाळासाहेब साळुंखे (२२) यांना अटक करण्यात आली. पुढील तपासादरम्यान हे खाते ओजस चौधरी (३०) याने वापरल्याचे उघडकीस आले, त्यालाही मुंबई सेंट्रल येथून अटक करण्यात आली.
गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार हे गोव्यात असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी गोवा गाठून स्थानिक पोलिसांच्या मदतीने आणखी ६ आरोपींना अटक केली. पोलिसांनी तपासादरम्यान आरोपींकडून मोठ्या प्रमाणावर तांत्रिक साधने आणि वाहने जप्त केली, ज्यामध्ये १५ हून अधिक महागडे मोबाइल फोन, ५ लॅपटॉप व एक टॅब, २ महागड्या कार, एक जग्वार (५० लाख रुपये) आणि महिंद्रा मझारो (८ लाख रुपये). या टोळीतील काही सदस्य परदेशात (कंबोडिया, नेपाळ) जाऊन ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळ्यांशी संपर्क साधत होते. भारतातील विविध बँक खाती विकत घेऊन, टेलीग्राम अँपद्वारे भारतीय नागरिकांची फसवणूक करण्यासाठी त्याचा वापर केला जात होता.
या संपूर्ण तपासाची जबाबदारी पोलीस उपायुक्त परिमंडळ ०१, सहाय्यक पोलीस आयुक्त डोंगरी विभाग आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक डोंगरी पोलीस ठाणे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने पार पाडली. डोंगरी पोलिसांच्या या कारवाईमुळे मोठ्या प्रमाणावर सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यात यश आले असून, गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे.