मुंबई पोलिसांना मोठा धक्का ! इस्थर अनुसया प्रकरणी फाशीची शिक्षा सुनावलेल्या आरोपीची निर्दोष मुक्तता
योगेश पांडे/वार्ताहर
मुंबई – सॉफ्टवेअर इंजिनीअर इस्थर अनुसया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी रिक्षा चालकाची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सुप्रीम कोर्टाने हा निकाल सुनावला. इस्थर अनुसया यांच्या हत्येप्रकरणी मुंबई हायकोर्टाने आरोपीला दोषी ठरवत फा्शीची शिक्षा सुनावली होती. सुप्रीम कोर्टात या निकालाला आव्हान दिले होते. मात्र, सुप्रीम कोर्टाने मुंबई हायकोर्टाचा निकाल रद्दबातल करत दोषी चंद्रभान सानप याची निर्दोष मुक्तता केली आहे. सरकारी वकिलांनी केलेल्या युक्तिवादात त्रुटी आढळल्याने सुप्रीम कोर्टाने सानपची सुटका केली. मुंबईतील विशेष महिला न्यायालयाने चंद्रभान सानपला भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ अंतर्गत हत्येच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावली होती. त्याचबरोबर कलम ३७६A अ अंतर्गत जन्मठेप आणि इतर कलमांखाली ५०,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेला हायकोर्टात आव्हान देण्यात आले. त्यानंतर दोषीने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. इस्थर अनुसया हत्या प्रकरणात पोलिसांनी ५४२ पानांचे आरोपपत्र दाखल केले होते. यामध्ये एकूण ४२ साक्षीदारांचे जबाब नोंदवले गेले होते. पोलिसांकडे मुख्य आरोपी चंद्रभान सानपविरोधात ठोस पुरावे होते. विशेषतः तपासादरम्यान मिळालेल्या डीएनए पुराव्याने सानपला शिक्षा ठोठावण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रकरणात सात साक्षीदारांची साक्ष निर्णायक ठरली. ज्यांनी घटनेच्या दिवशी सानपला इस्थरसोबत लोकमान्य टिळक टर्मिनसच्या बाहेर जाताना पाहिले होते. ओळख परेडदरम्यान या साक्षीदारांनी सानपची ओळख पटवली होती.
इस्थर आंध्रप्रदेशातील मच्छलीपट्टणम भागातील रहिवासी होती आणि मुंबईतील टीसीएस कार्यालयात काम करत होती. ख्रिसमसच्या निमित्ताने ती कुटुंबासोबत आंध्रप्रदेशला गेली होती. ५ जानेवारी २०१४ रोजी इस्थर मुंबईला परतली होती. पण लोकमान्य टिळक टर्मिनसवर उतरल्यानंतर ती बेपत्ता झाली. १६ जानेवारीला तिच्या कुटुंबीयांनी मोबाईल लोकेशनच्या आधारे इस्थरचा मृतदेह कांजूरमार्ग परिसरात कुजलेल्या अवस्थेत शोधून काढला. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. स्टेशनवरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे २ फेब्रुवारीला चंद्रभान सानपला अटक करण्यात केली होती. चौकशीत सानपने कबुल केले की, इस्थरला घरी सोडण्याच्या बहाण्याने तो तिला निर्जन स्थळी घेऊन गेला आणि लुटीच्या उद्देशाने तिची हत्या केली.