कल्याणमध्ये बांगलादेशी नागरिकांविरुद्ध पोलिसांची कडक कारवाई, पाच जणांना अटक
कल्याण – परिमंडळ ३ कल्याण पोलीस हद्दीत बेकायदेशीररित्या भारतात राहणाऱ्या बांगलादेशी नागरिकांविरुद्ध ठाणे शहर पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत मानपाडा पोलीस स्टेशन व महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीत विशेष तपास पथकांनी धाडी टाकून पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे. गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाईची योजना आखली. या माहितीनुसार, मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीत टाटानाका, देशमुख होम्स परिसर, गांधीनगर झोपडपट्टी (कल्याण पूर्व) आणि महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीत कल्याण पश्चिम रेल्वे स्थानक परिसरात बेकायदेशीरपणे बांगलादेशी नागरिक राहत असल्याचे उघड झाले. यासाठी मानपाडा आणि महात्मा फुले चौक पोलिसांनी स्वतंत्र तपास पथके तयार केली आणि तपास मोहीम हाती घेतली.
अटक आणि गुन्हे दाखल
तपासादरम्यान, एकूण पाच बांगलादेशी नागरिक बेकायदेशीररित्या भारतात राहत असल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडे भारतात प्रवेशासाठी आवश्यक असलेली वैध कागदपत्रे नव्हती. यापैकी चार बांगलादेशी नागरिकांविरुद्ध मानपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्यावर पारपत्र अधिनियम १९२० चे कलम ३ व ४ आणि परकीय नागरिक कायदा १९४६ चे कलम १३ व १४ अ (ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच एका बांगलादेशी महिलेविरुद्ध महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. क्रमांक ७८/२०२५ नुसार कारवाई करण्यात आली आहे. तिच्यावरही पारपत्र अधिनियम १९२० व परकीय नागरिक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व अटक आरोपींची चौकशी सुरू असून त्यांच्याशी संबंधित इतर कोणत्याही माहितीचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. परदेशी नागरिकांच्या बेकायदेशीर प्रवेश व वास्तव्याविरुद्ध अशा कारवाया भविष्यातही सुरूच राहतील, असे पोलिसांनी सांगितले आहे.