ग्रँटरोडच्या सेनोरिटा ऑर्केस्ट्रा बारची चुकीची माहिती देणाऱ्या वैद्यकीय अधिकारी व स्वच्छता निरीक्षकाच्या निलंबनाची मागणी
रवि निषाद/मुंबई
मुंबई – ग्रँटरोड येथील सेनोरिटा ऑर्केस्ट्रा बार व रेस्ट्रोरेंट अस्थापना धारक इस्टिंग हाऊसचा परवाना फक्त तळमजल्यावर असताना पोटमाळ्याचा वापर हॉटेल व्यवसायासाठी करत आहे. याबाबत तक्रार अर्ज व माहिती अधिकाराखाली माहिती मागविली असता डी विभागाच्या वैद्यकीय अधिकारी व स्वच्छता निरीक्षकाने दिशाभूल करणारी माहिती दिल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ते मनोहर जरियाल यांनी पालिका आयुक्तांकडे तक्रार केली आहे. या तक्रारीत त्यांनी वैद्यकीय अधिकारी व स्वच्छता निरीक्षकांना निलंबित करण्याची मागणी केली.
मिळालेल्या माहितीनुसार, सेनोरिटा ऑर्केस्ट्रा बार व रेस्ट्रोरेंटला इटिंग हाऊससाठी तळमजल्यावर ६७.१३ स्वेअर मीटर जागेवर परवाना देण्यात आला आहे. मात्र, सदर आस्थापनाधारक ५७.१५ स्वेअर मीटर जागा असलेल्या पोटमाळ्याचा बेकायदेशीर रीत्या हॉटेल व्यवसायासाठी वापर करीत आहे. त्याच प्रमाणे किचनच्या वापरासाठी जागा साधारण १०० स्वेअर फूट आवश्यक आहे. मात्र, या हॉटेलमध्ये अवघे ६० स्वेअर फुटात किचन थाटले आहे. नियमाप्रमाणे किचनच्या वरच्या भागात कुठलेही बांधकाम असता कामा नये, मात्र सदर आस्थापना धारकाने किचनच्या वर लाद्या काँक्रिटचा स्लॅब टाकला आहे. आग लागून मोठी दुर्घटना घडल्यास ग्राहकांच्या जीवावर बेतू शकते यामुळे या आस्थापनधारकाचा इटिंग हाऊसचा परवाना रद्द करण्यासाठी माहिती अधिकार कार्यकर्ते मनोहर जरियाल यांनी तक्रार अर्ज केला होता. मात्र वैद्यकीय अधिकारी प्राजक्ता आंबेरकर व स्वच्छता निरीक्षक रमेश झरे यांनी संबंधित हॉटेलव्यवसायकाला पाठीशी घालण्यासाठी दिशाभूल करणारी माहिती देऊन तक्रार अर्ज निकाली काढल्याचा आरोप मनोहर जरियाल यांनी केला आहे. कमला मिल सारखी दुर्घटना,पुण्यातील पोर्शे प्रकरण यासारख्या आगीची घटना घडून लोकांचे जीव जाण्याची वाट डी विभागाच्या वैद्यकीय अधिकारी प्राजक्ता आंबेरकर व स्वच्छता निरीक्षक रमेश झरे वाट पाहत आहेत काय असा प्रश्न मनोहर जरियाल यांनी उपस्थित केला आहे. जरियाल यांनी या संदर्भात पालिका आयुक्तांकडे वैद्यकीय अधिकारी प्राजक्ता आंबेरकर व स्वच्छता निरीक्षक रमेश झरे यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.