काळया जादूच्या नावाखाली भोंदूबाबाकडून महिलेला ८ लाख ८७ हजार रूपयांचा गंडा; शांतीनगर पोलिसांनी बाबाला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे/वार्ताहर
भिवंडी – भिवंडीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नवऱ्यावर काळी जादू झाली आहे, ती दूर करण्यासाठी काळ्या जादूचा धाक दाखवत एका भोंदूबाबाने महिलेला तब्बल ८ लाख ८७ हजार रुपयाचा गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. भोंदू बाबाला शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हजरत बाबा असं या आरोपीचं नाव आहे. भिवंडी शहरातील ४६ वर्षे महिलेचा पती आजारी होता. तिने डॉक्टरांना दाखवलं, पण उपचारात काही फरक पडला नाही. ऑक्टोंबर २०२३ ला हजरत बाबा या भोंदूबाबाची आणि महिलेची ओळख झाली होती. नोव्हेंबर २०२३ पहिल्यांदा मालेगावला जाऊन आले होते. महिलेचे कुटुंबीय, मृत व्यक्तीची बॉडी आणून पूजाविधी करून काळी जादू त्या मृत बॉडीमध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आठ लाख रुपये खर्च असल्याचं भोंदू बाबांनी सांगितलं होतं.
तुमच्या पती आणि मुलावर कुणीतरी काळी जादू केली असून त्यांच्यावरून अंडे फिरवून घेण्यास लावून मंत्रोपचार करून महिलेच्या कुटुंबीयांना अंड्यातून लोखंडी खिळा काढून दाखवला. हा चमत्कार पाहून महिला विश्वास बसला आणि कुटुंबीयांचा विश्वास संपादन केला. मृत व्यक्तीच्या बॉडी वर मंत्र उपचार करून काळया जादूचा नाश होईल, असा बनाव केला. त्यानंतर, या महिलेनं १ लाख ६३ हजार रुपये ऑनलाईन तर ७ लाख २४ हजार रुपये कॅश दिले. पण सगळा जादूटोणा केल्यानंतरही काहीच फरक पडला नाही. त्यानंतर या महिलेकडे पैसे नसल्याने भोंदू बाबाने तीन लाख रुपये दहा टक्के व्याजाने दिले होते. हे पैसे सहा महिन्यात २७ हजार रुपये प्रति महिन्याप्रमाणे भोंदू बाबाला दिले. पण, एवढा पैसे खर्च करून काहीच फरक पडत नसल्यामुळे या महिलेनं भोंदूबाबाला जाब विचारला. पण त्याने उलटसुलट उत्तरं दिल्यामुळे वाद चिघळला. अखेर या महिलेने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वंदना शिंदे यांच्याकडे सगळी हकीकत सांगितली. त्यानंतर शांतीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीच्या आधारे शांतीनगर पोलिसांनी मोठ्या शिताफीने भोंदू बाबाला अटक केली. भोंदू बाबाला न्यायालयात हजर केले असता १५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.