नालासोपाऱ्यात बनावट बॉडी स्प्रे बनवताना घरामध्ये भीषण स्फोट; ४ जण जखमी
योगेश पांडे/वार्ताहर
नालासोपारा – नालासोपाऱ्यात बॉडी स्प्रे चा भीषण स्फोट होऊन चार जण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना नालासोपाऱ्यामध्ये घडली आहे. बॉडी स्प्रे वरील एक्सपायरी डेट बदलण्याचे काम सुरु असताना भीषण स्फोट झाल्याने ही मोठी दुर्घटना घडली. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नालासोपाऱ्यात बॉडी स्प्रे चा भीषण स्फोट झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. या स्फोटात एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर स्थानिक खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यातील एकाची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये महावीर वडर (४१) त्यांची पत्नी सूनिता वडर मुलगी हर्षदा (१४) आणि (९) वर्षाचा मुलगा हर्षवर्धन वडर यांचा समावेश असून, यातील मुलगा हर्षवर्धन याची प्रकृती चिंताजनक आहे. नालासोपाराच्या आचोळा येथील संकेश्वर नगर मधील रोशनी अपार्टमेंटच्या रूम नंबर ११२ येथे सुगंधी द्रव्याच्या (बॉडी स्प्रे) बॉटल वरील संपलेल्या तारखा बदलण्याचे काम सुरू होते, त्यावेळी घरात स्फोट झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.