सुरक्षारक्षकांशी वाद झाल्याचा रागात थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याची धमकी; पोलीसांनी अखेर आरोपीला ठोकल्या बेड्या
योगेश पांडे/वार्ताहर
ठाणे – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इन्स्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. याप्रकरणी आरोपी हितेश झेंडे याला अखेर ठाणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलुंडच्या जंगलातून पोलिसांनी मोठ्या कसोशीने त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. हितेश धेंडे याचे ठाणे महापालिकेच्या कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात सुरक्षारक्षकांशी वाद झाला होता. याच रागातून त्याने थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या घरावर गोळीबार करण्याची धमकी इंस्टाग्राम लाईव्हच्या माध्यमातून दिली होती, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीचा धमकीचा व्हिडीओ व्हायरल होताच शिवसैनिकांनी रविवारी रात्री ठाण्याच्या श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांनी ६ तपास पथकं रवाना करत आरोपी हितेश झेंडे याचा कसून शोध घेतला. यावेळी मुलुंडच्या घोटीपाडा परिसरातील जंगलात हितेश पोलिसांना सापडला. त्याला ताब्यात घेऊन श्रीनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आलं. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला न्यायालयात हजर करण्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी दिली आहे.