२ हजारच्या नोटा बदलण्याचा गोरखधंधा सुरुच; पुन्हा गुजरात कनेक्शन आलं समोर
आरबीआयI समोर शेंगदाणे विकणाराच निघाला मास्टरमाइंड, नागपुरमध्ये २ हजारांच्या नोटा बदलून देणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
योगेश पांडे/वार्ताहर
नागपुर – दीड वर्षांपूर्वी भारतीय रिझर्व्ह बँकेनं दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या आहेत. या नोटा चलनातून बाद केल्यानंतर रिझर्व्ह बँकेनं या नोटा बदलून घेण्याचं आवाहन केलं होतं. त्यावेळी अनेकांनी या नोटा बदलून घेतल्या. मात्र आता नागपूर पोलिसांनी २ हजारांच्या नोटा बदलून देणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने चलनातून बाद केलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा बदलवून घेणाऱ्या मोठ्या रॅकेटवर नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. बाद केलेल्या दोन हजार रुपयांच्या नोटा मजुरांच्या माध्यमातून बदलवून घेतल्या जात होत्या. दिल्ली, गुजरात आणि उत्तरप्रदेश राज्यांशी या रॅकेटचं कनेक्शन तपासात उघड झालं आहे. मजुरांना काही रुपयांचं आमिष दाखवून त्यांच्याकडून लाखो रुपयांच्या नोटा बदलून घेतल्या जात होत्या. यामागे व्यापाऱ्यांची टोळी कार्यरत असल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली होती.
त्यानुसार नागपूर सदर पोलिसांनी दलाल नंदलाल मोर्या, किशोर बोहरिया, आणि व्यापारी अनिलकुमार जैन यांना मध्यप्रदेशमधून अटक केली. नोटा बदलून घेणाऱ्या टोळीचा मुख्य आरोपी अनिलकुमार जैन असून त्याने आतापर्यंत कोट्यवधींच्या नोटा बदलवल्या असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. जैन याने एका शेंगदाणे विक्रेत्याला हाताशी धरून हे रॅकेट चालवत होता. हा शेंगदाणे विक्रेताच सर्व रॅकेटचा मास्टरमाइंड असल्याची माहिती मिळाली आहे. आरोपी अनिलकुमार जैन दिल्ली आणि उत्तरप्रदेशातून २ हजारांच्या चलनी नोटा आणायचा. तर त्या नोटा नंदलाल मौर्य बदलून द्यायचा. नंदलाल मौर्य याचं नागपूरातील संविधान स्वायर परिसरात शेंगदाणे आणि इतर स्नॅक्स विकायचा. याच भागात विधीमंडळ आणि रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचं कार्यालय आहे. तो गरीब महिला आणि पुरुषांना २ हजार रुपयांच्या नोटा बदलून घेण्यासाठी रोजंदारी द्यायचा. ३०० ते ४०० रुपये देऊन तो या नोटा बदलून घ्यायचा. या नोटा बदलण्यासाठी नंदलाल मौर्य याने रोहित बावणे आणि किशोर बहोरिया यांना हाताशी धरलं होतं. बहोरिया हा झोपडपट्टीबहुल वस्तीत जाऊन गरीब महिला आणि पुरुषांना शोधायचा, त्यांना पैसे बदलून घेण्यासाठी तयार करायचा. पोलिसांनी या चारही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.